महिला दिनानिमित्त राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

राज्यातील सर्व क्षेत्रांतील महिलांच्या योगदानाचा गौरव ‘मल्टीमीडिया लाइट ॲण्ड साऊंड शो’च्या माध्यमातून करण्यात येणार
महिला दिनानिमित्त राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

राज्याचा पर्यटन विभाग आणि इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व क्षेत्रांतील महिलांच्या योगदानाचा गौरव ‘मल्टीमीडिया लाइट ॲण्ड साऊंड शो’च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे महिलांसाठी विशेष शो आयोजित करण्यात येणार असून, यानिमित्ताने राज्यभरातील विविध क्षेत्रांतील महिलांचाही सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त गेट वे ऑफ इंडियाच्या भिंतीवर देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाची आठवण करून देणारा ‘मल्टीमीडिया लाइट ॲण्ड साऊंड शो’ २८ फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला आहे. ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे रात्री आठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व महिला अधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल.

या कार्यक्रमाला राज्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या महिलांना आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रात योगदान दिलेल्या महिलांची माहिती देणारा पाच ते दहा मिनिटांचा ‘मल्टीमीडिया लाइट ॲण्ड साऊंड शो’ यावेळी होणार आहेत. तसेच महिला बालविकास विभागामार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण या दिवशी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन लोढा यांनी केले.

मुंबई उपनगरमध्ये महिलांसाठी फिरते कौशल्य विकास केंद्र तसेच फिरते स्वच्छतागृह हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविला जात असून, उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर इतर महानगरातही हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन संचालक बी. एन. पाटील, महिला आणि बालविकास आयुक्त आर. विमला, इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक बी. एन. दास, पर्यटन विभागाच्या सहसचिव उज्जला दांडेकर उपस्थित होत्या.

logo
marathi.freepressjournal.in