
मुंबई : पुण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते अनिल शिवाजीराव भोसले यांच्यावरील कारवाईत मदत करण्याचे आश्वासन देऊन त्यांना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या पत्नीकडे तोतया ईडी अधिकाऱ्याने पंधरा कोटीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या घटनेची ईडीने गंभीर दखल घेत वरळी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या तोतया अधिकाऱ्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह खंडणी आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा वरळी पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. सुनिलकुमार हे अंमलबजावणी संचालनालयात सहाय्यक निर्देशक म्हणून मुंबई झोनल कार्यालयात कार्यरत असून, त्यांचे वरळी येथे मुख्य कार्यालय आहे. तीन वर्षांपूर्वी पुण्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते अनिल भोसले यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. गुन्हा दाखल होताच त्यांना अटक करण्यात आली होती. नंतर त्याच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. त्याची नियमित सुनावणी सुरू आहे. अनिल भोसले याची पत्नी रेश्मा ही पुण्याच्या पाशाण, अमर लँडमार्क अपार्टमेंटमध्ये राहते. २३ ऑक्टोंबरला तिला एका अज्ञात व्यक्तीने एक मॅसेज केला होता. त्यात ईडी विभागाच्या पत्राचा वापर करुन तिला संबंधित व्यक्तीने तो ईडी अधिकारी असल्याचे भासविले होते. तिचे पती अनिल भोसले यांना या संपूर्ण प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी संबंधित तोतया अधिकाऱ्याने तिच्याकडे पंधरा कोटीची मागणी केली होती.