
शिरीष पवार / मुंबई
चांदिवली विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत ४०९ मतांच्या फरकाने विजयी झालेले त्यावेळच्या मूळ शिवसेनेचे दिलीप (मामा) लांडे यावेळी शिवसेना शिंदे गटातर्फे इथून पुन्हा उभे ठाकले आहेत. त्यांचा मुकाबला गेल्या वेळचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे मोहम्मद आरिफ नसीम खान यांच्याशीच होत आहे. यावेळी सुद्धा ही टक्कर अटीतटीची होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
महायुतीतर्फे शिवसेनेचे दिलीप भाऊसाहेब लांडे, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांच्या व्यतिरिक्त येथे आणखी एक अपक्ष दिलीप लांडे, मनसेचे महेंद्र भानुशाली, राष्ट्रीय उलेमा कौन्सिलचे सबील तुफिल अहमद सिद्दीकी, मजलीस -ई- इन्किलाब -ई-मिल्लतचे गफार इब्राहिम सय्यद असे एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत.
विद्यमान आमदार लांडे यांना यावेळी पुन्हा आव्हान देणारे नसीम खान हे काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत. नसीम खान हे येथून २००९ आणि २०१४ मध्ये आमदार होते. २००९ मध्ये त्यांनी त्यावेळी मनसेचे उमेदवार असलेले दिलीप लांडे यांचा ३३ हजार ७१५ मतांनी पराभव केला होता, तर २०१४ मध्ये नसीम खान यांनी शिवसेनेचे संतोष रामनिवास सिंह यांना २९ हजार ४६९ मतांच्या फरकाने पराभूत केले होते. त्यावेळी मनसे उमेदवार ईश्वर तायडे तिसऱ्या क्रमांकावर होते (२८,६७८ मते). २०१९ मध्ये मात्र शिवसेनेतर्फे लढलेले दिलीप लांडे यांना ८५,८७९, तर काँग्रेसचे नसीम खान यांना ८५,४७० मते मिळाली होती. अवघ्या ४०९ मतांनी लांडे विजयी झाले होते. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अब्दुल खान यांनी ८८७६, तर मनसेने ७०९८ मते घेतली होती. लांडे यांनी मनसे सोडल्यानंतर मनसेच्या मतांच्या टक्केवारीत २०१४ मध्ये १५ टक्के घट झाली, तर २०१९ मध्ये ११.८७ टक्के घट झाली. २०१४ मध्ये नसीम खान यांच्या मतांच्या टक्केवारीत १२.१२ टक्के घट होऊनही ते जिंकले, तर २०१९ मध्ये त्यांच्या मतांची टक्केवारी चार टक्के वाढूनही ते पराभूत झाले. काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातील चांदिवली क्षेत्रातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना ४,३२४ मतांची आघाडी मिळाली होती. या मतदारसंघात अनुसूचित जातीची ६.२९ टक्के, तर मुस्लिम समाजाची २७.६ टक्के मते आहेत. मतदारांमध्ये उत्तर भारतीय त्याचप्रमाणे मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे.
दिलीप मामा लांडे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. हिंदी भाषिकांच्या विविध समाजाच्या बैठका त्यांच्यासाठी होत आहेत. गेल्या वीस वर्षांत झाला नाही एवढा विकास वीस महिन्यांत केल्याचा दावा लांडे करीत आहेत, तर नसीम खान यांनीही जोरदार मोर्चेबांधणी केली असून 'भ्रष्टाचारमुक्त चांदिवली'ची घोषणा केली आहे. लोकांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा पुरविणे तसेच इमारतींना कन्व्हियन्सचा हक्क मिळवून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
मतदारसंघातील प्रश्न
- रस्ते, पदपथावरील अतिक्रमणे तसेच बेकायदा गॅरेज
- बेकायदा तसेच धोकादायक होर्डिंग
- मोकळी मैदाने, उद्यानांमध्ये विकासकामांच्या नावाखाली सुरू असलेली बांधकामे
- खेळाची पुरेशी मैदाने उपलब्ध नसणे
- बांधकामे तसेच कारखाने यांच्याद्वारे होणारे प्रदूषण, धूळ, धूर
- अपूर्ण अवस्थेतील रस्ते प्रकल्प
पुरुष - २,५३,५२६
महिला - १,९९,४५८
तृतीयपंथी - १९
एकूण मतदार - ४,५३,००३