भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा; माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

२६/११ रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्यांच्या बंदुकीतील नव्हती तर रा. स्व. संघाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या बंदुकीतील होती, असा आरोप माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांनी आपल्या पुस्तकातून केला होता.
भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा; माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

नवी दिल्ली : २६/११ रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवाद्यांच्या बंदुकीतील नव्हती तर रा. स्व. संघाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या बंदुकीतील होती, असा आरोप माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांनी आपल्या पुस्तकातून केला होता. या मुद्यावरून देशभरात गदारोळ माजला आहे. हा खटला चालवणारे तत्कालीन सरकारी वकील व भाजपचे विद्यमान उमेदवार उज्ज्वल निकम यांनी या हल्ल्याला कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींना वाचवले. त्यामुळे निकम यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांनी केली आहे.

एका ‘वृत्तवाहिनी’ला दिलेल्या मुलाखतीत मुश्रीफ म्हणाले की, हेमंत करकरे यांना प्रभाकर आलोक आणि ज्यांनी वरून खाली गोळ्या घातल्या ते पोलीस अधिकारी हे दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित आहेत, अशी आम्हाला माहिती मिळाली. याचाच अर्थ तत्कालीन सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरएसएसच्या दोन लोकांना वाचवण्यासाठी, या सर्व हल्ल्यामागील जबाबदार असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तीला आणि करकरेंना मारणाऱ्या व्यक्तींना वाचवले. हे देशद्रोही कृत्य आहे. त्यामुळे प्रभाकर आलोक, संजय गोयीलकर ज्यांनी गोळ्या मारल्या आहेत ते आणि उज्ज्वल निकम या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत आहे, असे एस. एम. मुश्रीफ यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. माजी पोलीस अधिकार एस. एम. मुश्रीफ यांनी लिहिलेल्या ‘हू किल्ड करकरे’ नावाच्या पुस्तकाचा दाखला देत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी आरोप केल्यानंतर देशभरात खळबळ माजली. मुश्रीफ म्हणाले की, “हू किल्ड करकरे’ हे माझे पुस्तक २००९ मध्ये प्रकाशित झाले. आता उज्ज्वल निकम यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर मला वाटते याबाबत योग्य बाजू बाहेर यायला हवी. कारण निकम हे या खटल्यात सरकारी वकील होते. ज्यावेळेस एखाद्याचा बुलेटने मृत्यू होतो, त्यावेळेस त्याच्या शरीरातल्या गोळ्या या फॉरेन्सिक एक्स्पर्टकडे पाठवल्या जातात. ज्या शस्त्रातून गोळी उडाल्याचा संशय आहे ते शस्त्र तपासले जाते. या शस्त्रातून गोळ्या उडवल्या गेल्या की नाहीत याची शहानिशा होते. करकरे यांच्या शरीरातून ज्या गोळ्या मिळाल्या त्याची तपासणी फॉरेन्सिक विभागाने केली. करकरे यांच्या शरीरातील गोळ्या या अजमल कसाबच्या रायफलमधून उडवलेल्या नव्हत्या. किंवा त्याचा इस्माईल नावाचा साथीदार होता त्याच्याही रायफलमधून उडवलेल्या नव्हत्या, असा स्पष्ट उल्लेख रिपोर्टमध्ये केला होता, असा दावा एस. एम. मुश्रीफ यांनी केला.­

logo
marathi.freepressjournal.in