
खासदार नवनीत राणा यांचे लिलावती रुग्णालयातील एमआरआय रूममध्ये फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याच प्रकरणात लवकरच नवनीत राणा, त्यांचे आमदार पती रवी राणा, त्यांच्यासोबत असलेल्या सिक्युरिटी गार्डची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे.
राजद्रोहाच्या गुन्ह्यांत भायखळा महिला कारागृहातून जामीनावर सुटका होताच ६ मे रोजी खासदार नवनीत राणा यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना पाठदुखीसह मानदुखीचा त्रास होत असल्याने त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या होत्या. यावेळी डॉक्टरांनी त्यांना एमआरआय आणि इतर टेस्ट करण्याचा सल्ला दिला होता. त्या तळमजल्यावरील रेडिओलॉजी विभागात पोहोचल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या पांढरा शर्ट घातलेल्या व्यक्तीने त्यांचे एमआरआय मशीन ट्रॉलीवरली फोटो काढून ते समाजमाध्यमांवर टाकले. या व्यक्तीने नियमांचे उल्लघंन करून फोटो काढल्यामुळे त्याच्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी ४४८, ३३६ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.