सिनेअभिनेत्रीची फसवणूक; जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल

संजीव रमेश कोचर आणि बिंदीया संजीव कोचर अशी या दोघांची नावे असून, त्यांच्यावर फ्लॅटचा व्यवहार करून एक कोटीचा अपहार केल्याचा आरोप आहे.
सिनेअभिनेत्रीची फसवणूक; जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : सिनेअभिनेत्रीची फसवणूक केल्याप्रकरणी एका जोडप्याविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संजीव रमेश कोचर आणि बिंदीया संजीव कोचर अशी या दोघांची नावे असून, त्यांच्यावर फ्लॅटचा व्यवहार करून एक कोटीचा अपहार केल्याचा आरोप आहे. अंधेरी येथे राहणारी कंगना शर्मा ही सिनेअभिनेत्री असून, तिचे पती बांधकाम व्यावसायिक आहेत. गेल्या वर्षी त्यांनी कोचर कुटुंबीयांचा अंधेरीतील ओशिवरा, मेगा मॉलजवळील ग्रॅट रेसीडन्सीच्या विंडसर इमारतीचा सातव्या मजल्यावरील एक फ्लॅट विकत घेण्याचा निर्णय घेतला होता. चर्चेअंती त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा सौदा नऊ कोटी रुपयांमध्ये झाला होता. मात्र काही दिवसांनी संजीवने फ्लॅटची किंमत जास्त आहे, त्यामुळे त्यांना आता फ्लॅट नऊऐवजी बारा कोटीमध्ये विक्री करायचा आहे असे सांगितले; मात्र ही किंमत जास्त असल्याने त्यांच्यातील व्यवहार रद्द झाला होता. त्यामुळे तिने फ्लॅटसाठी दिलेली रक्कम परत करण्यास सांगितली; मात्र त्यांनी ५० लाख रुपये देण्याची तयारी दर्शवून उर्वरित साठ लाख रुपये देणार नाही, असे सांगितले. या दोघांकडून पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने कंगना शर्माने घडलेला प्रकार ओशिवरा पोलिसांना सांगून संजीव कोचर आणि त्याची पत्नी बिंदीया कोचर यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in