आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर चर्चेत आलेले एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीने क्लीन चिट दिली आहे. धर्म लपवून मागासवर्गीयांचे हक्क हिरावल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या आरोपाची चौकशी केल्यानंतर जात पडताळणी समितीने समीर वानखेडे यांना जन्माने मुस्लिम नसल्याचे सांगत क्लीन चिट दिली.
याप्रकरणी जात पडताळणी समितीने ९१ पानांचा आदेश जारी केला आहे. समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्रही समितीने कायम ठेवले आहे. समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्म स्वीकारला नाही आणि ते अनुसूचित जाती (महार-37) प्रवर्गातील असल्याचे समितीने म्हटले आहे. दरम्यान, जात पडताळणी समितीने काढलेल्या निष्कर्षानंतर समीर वानखेडे यांनी सत्यमेव जयते असे ट्विट करत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, मनोज संसारे, अशोक कांबळे, संजय कांबळे यांनी वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. आपला मूळ धर्म लपवून मागास जात असल्याचे भासवल्याचा दावाही तक्रारकर्त्यांनी केला आहे. मात्र, जात पडताळणी समितीने तक्रारदारांनी केलेल्या दाव्याची पडताळणी करता आली नसल्याचेही सांगितले.