पाऊण तासाचा प्रवास १० ते १५ मिनिटांत! अखेर कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला होणार; एका मार्गिकेचे सोमवारी उद्घाटन

‘धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड’ची थडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राईव्हदरम्यान एक मार्गिका सोमवारपासून...
पाऊण तासाचा प्रवास १० ते १५ मिनिटांत! अखेर कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला होणार; एका मार्गिकेचे सोमवारी उद्घाटन

मुंबई : ‘धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड’ची थडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राईव्हदरम्यान एक मार्गिका सोमवारपासून अंशतः वाहतुकीसाठी खुली होणार आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते दक्षिण मुंबईतील एका मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे.

कोस्टल रोड प्रकल्पाचे काम पूर्ण न झाल्याने पंतप्रधानांच्या हस्ते पूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, कोस्टल रोड परिसरात ३२० एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाचे पार्क साकारले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी कोस्टल रोड प्रकल्पासह विविध कामांची पाहणी केली. मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रकल्पाचे ८६ टक्के काम पूर्ण झाले असून मे अखेरपर्यंत संपूर्ण मार्ग मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वरळीमधील गणपतराव कदम मार्ग, सेठ मोतीलाल सांघी मार्ग आणि त्यानंतर दादर येथील दादासाहेब रेगे मार्ग या तीन ठिकाणी रस्ते काँक्रीटीकरण कामांची पाहणी त्यांनी केली. रस्ते काँक्रीटीकरणामुळे मुंबई महानगरात रस्ते खड्डेमुक्त होतील, याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

पावसाळ्यात पाणी शोषून खड्ड्यांद्वारे जमिनीत मुरवण्यासाठी या काँक्रीटीकरण कामांमध्ये ठरावीक अंतरावर रस्त्यांच्या कडेला शोष खड्ड्यांचा समावेश केला असल्याने ही कामे पर्यावरणपूरक आहेत. तसेच उपयोगिता वाहिन्यांचा (डक्ट) समावेश करण्यात आल्याने वेगवेगळ्या सेवा वाहिन्या त्यातून नेण्यात येतील. परिणामी, रस्ते वारंवार खोदले जाणार नाहीत आणि रस्त्यांचे आयुर्मान व गुणवत्ता वाढेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्ग खुला होणार

कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणात तीन लेनची एकच बाजू सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वरळीहून मरीन ड्राईव्ह येथे जाता येणार आहे. हा मार्ग सकाळी ८ ते रात्री ८ असा केवळ बारा तासच सुरू राहणार आहे. कोस्टल रोडचा उत्तरेकडील मार्ग पूर्ण करण्याचे काम आणि कोस्टल रोडला वरळी आणि शिवडी सागरी सेतूला जोडण्याचे काम करण्यात येणार आहे.

पाऊण तासाचा प्रवास फक्त दहा मिनिटांत

कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मुंबईतील थडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राईव्हदरम्यान चार लेनची एक मार्गिका वाहतुकीसाठी अंशतः खुली झाल्यानंतर पाऊण तासाचा प्रवास १० ते १५ मिनिटांत होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in