अखेर कशेडी बोगद्याची सिंगल लेन सुरू; सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन

सिंगल लेनवरून वाहतूक खुली करण्यात येईल
अखेर कशेडी बोगद्याची सिंगल लेन सुरू; सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : गणेशोत्सवापूर्वी कशेडी बोगद्याची सिंगल लेन सुरू करणारच, असे आश्वासन राज्य सरकारने सर्व कोकणवासीयांना दिले होते. मात्र हे आव्हान आणि दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली व अतिशय युद्धपातळीवर काम केले. केवळ अधिकारी, तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांचे प्रामाणिक प्रयत्न तसेच एकजुटीमुळेच विक्रमी वेळात हे काम पूर्ण होऊ शकले, असे उदगार सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी काढले. त्यांच्या हस्ते मंगळवारी कशेडी बोगद्याचे रितसर उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन झाल्यानंतर कशेडी बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ वृक्षारोपणदेखील करण्यात आले. रायगडच्या पोलादपूरमधील भोगाव ते खेड तालुक्यातील कशेडी हे अंतर पार करण्यासाठी आजवर सुमारे ४५ मिनिटे वेळ लागायचा. पण आता कशेडी बोगदा सिंगल लेन वाहतुकीसाठी खुला झाला आहे. हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग नऊ किलोमीटरचा आहे. अशा या बोगद्यामुळे पोलादपूर ते कशेडी हे अंतर अवघ्या १० ते १५ मिनिटात कापता येणार आहे, असेही रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. कोकणात गणपतीसाठी वाहनाने जाणाऱ्या गणेशभक्तांचा जवळपास ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

सिंगल लेनचे ९० टक्के काम पूर्ण

मुंबई-गोवा महामार्गाच्या सिंगल लेनचे ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. सध्या काँक्रिटीकरणाच्या या कामातील महत्त्वाचा क्युरिंग पिरियड सुरू आहे, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. १५ सप्टेंबरनंतर बरेच कोकणवासी गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जायला निघतील; त्यापूर्वीच या सिंगल लेनवरून वाहतूक खुली करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले

१५ मिनिटांवर नागरी सुविधा केंद्र

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या आणि वाहनचालकांच्या सोयीसाठी महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दर १५ किमी अंतरावर नागरी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. याठिकाणी चहापाण्याची व्यवस्था, शौचालय सुविधा, पोलीस मदत कक्ष, वाहनचालकांसाठी आराम कक्ष अशा अत्यावश्यक सोयीसुविधा पुरवण्यात येत आहेत, याचे उद्घाटन चव्हाण यांच्या हस्ते खारपडा येथे करण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in