अखेर गोडे पाणी प्रकल्प मार्गी लागणार!

मुंबई महापालिका लवकरच निविदा काढणार
अखेर गोडे पाणी प्रकल्प मार्गी लागणार!

मुंबई : मुंबईतील पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेता, समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य गोड करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३ हजार ९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सद्यस्थितीत मुंबईची लोकसंख्या १ कोटी ४० लाखांच्या घरात आहे. भविष्यात लोकसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता, मुंबईला ४,५०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार असल्याचे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. परंतु मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची संख्या मर्यादित असून नवीन धरण उभारणे सद्यस्थितीत शक्य नाही. त्यामुळे पाण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. समुद्रात सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य गोडे करण्याचा प्रकल्प राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र प्रकल्प राबवण्यात अनेक अडचणी येत असल्याने हा प्रकल्प रखडला आहे. परंतु आता प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला असून लवकरच निविदा मागवण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत गेल्या काही वर्षांत उंच इमारती आणि टॉवरची संख्या सातत्याने वाढत आहे. हॉटेल आणि सेवा उद्योगांचाही मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे. रहिवासी प्रकल्पांबरोबरच भेंडी बाजार, धारावी पुनर्विकासासारखे समूह पुनर्विकासाचे प्रकल्प राबवले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात मुंबईकरांची पाण्याची मागणी वाढत जाणार आहे. तसेच वातावरणीय बदलामुळे पाऊस लहरी झाला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहणे भविष्यात अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे पालिका मुंबईसाठी पाण्याचे नवे स्रोत शोधत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी बनवण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

१३ हजार कोटींचा प्रकल्प !

खाऱ्या पाण्यापासून खनिजे आणि मीठ वेगळे करून पिण्याचे पाणी तयार केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेने मालाड, मनोरी येथे जागाही निश्चित केली आहे. १२ हेक्टर जागेवर हा प्रकल्प राबवला जाणार असून हा पर्यावरणपूरक प्रकल्प आहे. प्रकल्पाला सौर ऊर्जेतून वीजपुरवठा केला जाणार आहे. प्रकल्पाला १३ हजार २८ कोटींचा खर्च येणार आहे. कंत्राटदाराला हा प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करायचा आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्यातून मुंबईकरांना दरदिवशी ४०० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in