
मुंबई : मुंबईतील फेरीवाल्यांनंतर आता मासे विक्रेते बचत गट, अर्धवेळ विक्रेत्यांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत मासे विक्रेते, बचत गटांतील व्यावसायिक महिला व अर्धवेळ विक्रेत्यांना कर्ज मिळणार आहे. या योजनेचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी विभागनिहाय मेळावे घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी केल्या आहेत.
मुंबई शहर, पूर्व व पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात पथ विक्रेते आहेत. त्यांच्या व्यवसायास खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाकडून ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ राबविण्यात येत आहेत. मुंबईत या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ३८ हजार इतक्या अर्जदारांना कर्ज मिळण्यासाठी शिफारस पत्र मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी साधारणपणे एक लाख पथ विक्रेत्यांना विविध बँकांमार्फत अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे. पुढील काळात जास्तीत जास्त पथ विक्रेत्यांना या योजनेचा लाभ मिळावा, याचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी चहल यांनी बैठक घेतली. या आढावा बैठकीस योजनेचे समन्वयक तथा उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्यासह सर्व परिमंडळाचे उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
विभागनिहाय मेळावे घ्या!
मासे विक्रेते, बचत गटांतील व्यावसायिक महिला तसेच अर्धवेळ विक्रेत्यांना या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे. त्यांना व्यवसायासाठी या योजनेतंर्गत अर्थसहाय पुरविण्यात येणार आहे. तसेच ज्या विभागात पथ विक्रेते, फेरीवाले जास्त आहेत, त्या विभागात या योजने अंतर्गत जास्त उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. मुंबईतील विविध ठिकाणी भरणाऱ्या आठवडे बाजारातील पथ विक्रेत्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात यावा, असेही चहल यांनी सांगितले.
स्वनिधी योजनेसाठी येथे अर्ज करा!
संबंधित इच्छुक पथविक्रेत्याने https://pmsvanidhi.mohua.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. तसेच त्याच्याकडे आधार कार्डशी जोडणी असलेला भ्रमणध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे. पथविक्रेत्याने स्वत: व्यवसाय करणे आवश्यक आहे. सदर योजनेचा लाभ घेतल्यास “स्वनिधी से समृद्धीतक” या प्रधानमंत्री यांच्या योजनेचा लाभ संपूर्ण कुटुंबास प्राप्त होणार आहे.