
मुंबई : वांद्रे पोलिसांनी एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ शशिधर जगदीशन आणि इतर सात जणांविरुद्ध फसवणूक आणि विश्वासघाताच्या आरोपाखाली विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची तक्रार लीलावती कीर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टचे (एलकेएमएम ट्रस्ट) कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत मेहता यांनी दाखल केला आहे. ट्रस्टच्या सात माजी विश्वस्तांवरही गुन्हा दाखल केला. ही कारवाई महानगर दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून लीलावती रुग्णालयात दोन गटांतील विश्वस्तांमध्ये संघर्ष सुरू आहे. आतापर्यंत पाच गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही बड्या आर्थिक संस्थेच्या एमडी व सीईओविरोधात गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
रुग्णालयाचे कायमस्वरूपी विश्वस्त प्रशांत मेहता यांनी एचडीएफसी बँकेचे सीईओ आणि एमडी शशिधर जगदीशन यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली.
प्रशांत मेहता यांनी पत्रकार परिषदेत रुग्णालयाचे कार्यकारी संचालक आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या उपस्थितीत म्हटले, “ही कोणतीही खासगी वादाची बाब किंवा व्यापारी गैरसमज नाही. ही धर्मादाय संस्थेच्या कर्तव्यासोबत आणि कायद्याच्या राज्याच्या संकल्पनेसोबत झालेली गंभीर फसवणूक आहे. एचडीएफसीचे अध्यक्ष शशिधर जगदीशन यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून सत्य लपवले आणि न्यायप्रक्रियेला बगल दिली, असा आरोप त्यांनी केला.
मेहता यांनी सांगितले की, “हा गुन्हा केवळ आरोपांवर आधारित नाहीत, तर जप्त केलेल्या रोख नोंदी, हस्तलिखित डायऱ्या, ईमेल पुरावे, लाच देण्याचे प्रयत्न, सीएसआर निधीचा गैरवापर, आंतरराष्ट्रीय बँकिंग व्यवहार, बनावट देयक पावत्या यावर आधारित आहेत.” तसेच, विश्वस्त किशोर मेहता (८४) यांना १०० हून अधिक वेळा कायदेशीर समन्स बजावण्यात आले होते.
गुन्ह्यात म्हटले आहे की, जगदीशन यांना माजी विश्वस्तांनी रोख स्वरूपात २.५ कोटी रुपये दिले होते आणि ही रक्कम जप्त डायरीत नोंदलेली आहे. ट्रस्टच्या २५ कोटी रुपयांच्या ठेवी कोणतेही अधिकृत ठराव किंवा मंजुरी न घेता एचडीएफसी बँकेत भरल्या गेल्या. १.५ कोटी रुपयांची लाच सीएसआर देणगी म्हणून दाखवली गेली. जेणेकरून वरिष्ठ डॉक्टरांनी महत्त्वाचे दस्तावेज लपवावेत किंवा नष्ट करावेत.”
मेहता यांनी आरोप केला की, जगदीशन यांनी त्यांच्या बँकेतील सर्वोच्च पदाचा गैरवापर करून बाद केलेल्या विश्वस्त गटाचे रक्षण केले, मालमत्तांची माहिती लपवण्यास मदत केली आणि ट्रस्टच्या कायदेशीर हितधारकाविरुद्ध बनावट गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्पष्ट केले की, मनी लाँड्रिंग आणि निधीच्या अपहाराचे आरोप बँकेविरोधात नाहीत, तर फक्त बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीशन यांच्या विरोधात आहेत.
कर्जवसुली रोखण्यासाठीच आरोप
एचडीएफसी बँकेच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “बँकेकडून ६५ कोटींची कर्जवसुली रोखण्यासाठीच जगदीशन यांच्याविरोधात खोटे आणि द्वेषमूलक खटले दाखल केले जात आहेत. ट्रस्टचा कर्जबुडवेपणा सिद्ध झाल्यानंतर, कुटुंबीय ट्रस्टच्या नावाचा गैरवापर करून बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत.” यापूर्वीही अशाच खोट्या कायदेशीर कारवायांच्या माध्यमातून वसुली प्रक्रियेला अडथळा आणण्याचे प्रकार केल्याचे त्यांनी सांगितले.