पवई हिरानंदानी येथील हायको सुपरमार्केटमध्ये आग

पवई, हिरानंदानी संकुल येथे तळमजला अधिक पाच मजली ‘हायको सुपारमार्केट’ आहे.
पवई हिरानंदानी येथील हायको सुपरमार्केटमध्ये आग

पावसाने मुंबईत दमदार हजेरी लावल्यानंतर पडझडीच्या घटनांचे सत्र सुरू झाले आहे. घरे, इमारत, झाडे कोसळण्याच्या घटना सुरू असताना पवई हिरानंदानी येथील हायको सुपरमार्केटमध्ये गुरुवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. मात्र सकाळची वेळ असल्याने मार्केट बंद होते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

पवई, हिरानंदानी संकुल येथे तळमजला अधिक पाच मजली ‘हायको सुपारमार्केट’ आहे. मार्केट इमारतीमधील पाचव्या मजल्यावरून धूर येऊ लागला. पाठोपाठ मार्केटमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. आगीबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे काम सुरू केले. मात्र अवघ्या एका तासातच म्हणजे सकाळी ७.०५ च्या सुमारास आग भडकली. त्यामुळे अग्निशमन दलाने सदर आग ‘स्तर -२’ची असल्याचे जाहीर केले.

अग्निशमन दलाची यंत्रणा अपुरी पडू लागल्याने आणखी यंत्रणा मागवण्यात आली. दलाकडून ८ फायर इंजिन, ५ जम्बो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने आगीवर ११.१ वाजताच्या सुमारास नियंत्रण मिळवले. दरम्यान, आगीच्या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. घटनास्थळी पोलीस, पालिका एस. विभागाचे ५ कामगार उपस्थित होते. आग कशी लागली याबाबतचे कारण समजू शकलेले नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in