टिळक नगरमधील ‘रेल व्हीव’ला आग; ३५ रहिवासी थोडक्यात बचावले

लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ ‘रेल व्हीव’ ही इमारत आहे. तिच्या १२ व्या मजल्यावरील एका घरात आग लागली
टिळक नगरमधील ‘रेल व्हीव’ला आग; ३५ रहिवासी थोडक्यात बचावले

चेंबूरच्या टिळक नगर येथील रेल व्हीव इमारतीच्या १२ व्या मजल्यावर शनिवारी दुपारी आग लागली. अग्निशमन दलाने या इमारतीच्या १०, ११, १२ मजल्यावर अडकलेल्या ३५ रहिवाशांची सुखरुप सुटका केली. दरम्यान, १२ व्या मजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक वायरिंग, कचरा, कपडे यामुळे आगीचा भडका उडाला असून आगीवर सव्वादोन तासांनी नियंत्रण मिळवल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी सांगितले.

लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ ‘रेल व्हीव’ ही इमारत आहे. तिच्या १२ व्या मजल्यावरील एका घरात आग लागली. त्याची माहिती मिळताच दोन फायर इंजिन आणि १ जंबो वॉटर टँकर घटनास्थळी दाखल होऊन दलाने बचावकार्य सुरु केले. या आगीचा धूर ११ व्या मजल्यापर्यंत पसरत गेला. दुपारी पावणे तीन वाजता ‘लेव्हल १’ ची आग घोषित करण्यात आली. आग लागल्याची माहिती समजताच रहिवाशांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीबाहेर धाव घेतली, तर इमारतीतील चार रहिवासी जीव वाचवण्यासाठी बाहेर सज्जाजवळ येऊन थांबले. तर धूर पसरल्यामुळे काहींना बाहेर पडता न आल्याने घरातच अडकले. या रहिवाशांची सुटका करण्याचे आणि आग विझविण्याचे काम अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

अखेर अडकलेल्या सर्व ३३ रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात दलाला यश आले. दरम्यान, आगीची तीव्रता आणि धूर पसरत गेल्याने अग्निशमन दलाकडून आगीची लेव्हल २ ची घोषणा करण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी ८ फायर इंजिन आणि ५ जम्बो वॉटर टँकर दाखल झाले. पावणे पाच वाजताच्या दरम्यान दलाला आग विझवण्यात यश आले. आगीत कोणीही जखमी झालेले नाही. आग कशामुळे लागली याचा अधिक तपास सुरु असल्याचे ते म्हणाले.

६ जण रुग्णालयात दाखल!

‘रेल व्हीव’ इमारतीतील आगीमुळे सहा रहिवाशांना त्रास झाला असून त्यांना जवळील एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सगळ्याची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाचे डॉ. सेन यांनी सांगितले.

रुग्णालयात दाखल जखमी

अर्चना मालवणकर, अंजली आंद्रे, नीना आंद्रे, रुतुजा पोहक, कैलास आंद्रे, सचिन आंद्रे या सगळ्यांना धुरामुळे त्रास झाला असून उपचारासाठी जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे.

माजी महापौरांनी दिली भेट!

आगीची माहिती मिळताच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक अनिल कोकीळ उपस्थित होते. पेडणेकर यांनी इमारतीमधील नागरिकांशी संवाद साधला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in