

मुंबई : मुंबईत ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीवर परिणाम करणारी एक धक्कादायक घटना घडली असून कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानकांदरम्यान कचरा उचलणाऱ्या लोकल गाडीत अचानक मोठी आग लागली. ही आग मोठी होती असे प्रथमदर्शनी दिसत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पण अशाप्रकारच्या आगीच्या घटनेमुळे प्रत्यक्षदर्शींना मोठा धक्का बसला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही हानी झालेली नाही. कुर्ला येथील सायडिंगमध्ये उभ्या असलेल्या कचरा लोकल गाडीच्या दुसऱ्या डब्याला आग लागल्याची घटना घडली आहे.
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव पावणे नऊ वाजल्यापासून अप स्लो लोकल मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या विद्याविहार रेल्वे स्थानकाहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेला जाणारी स्लो लोकल ट्रेन वाहतूक तात्पुरता बंद असल्याची माहिती आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. ही आगीची घटना ८ वाजून ३८ मिनिटांनी घडली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग नेमकी का लागली? ते अद्याप समजू शकलेले नाही.