
मुंबई : धारावी ९० फिट रोडवर असलेल्या तळ अधिक सात मजली शर्मा इमारतीत रविवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत सात महिन्याच्या मुलांसह एकाच कुटुंबातील पाच, तर दुसऱ्या मजल्यावरील एक असे सहा जण जखमी झाले. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
धारावी ९० फिट रोडवर असलेल्या तळ अधिक सात मजली शर्मा इमारतीत रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. मुंबई अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले; मात्र या दुर्घटनेत ७ महिन्यांचे रावण शेख व ५ वर्षांची मुलगी नादीया शेख हिच्या सह एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत, तर दुसऱ्या मजल्यावरील एक व्यक्ती जखमी झाले असून, सहा ही जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, मुंबई अग्निशमन दलाने १२.३० वाजता आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेची स्थानिक पोलीस, जी उत्तर विभागाचे अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी चौकशी करत असल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
जखमींची नावे
रावण शेख ( ७ महिने), नादिया शेख (५ वर्षें), मुस्कान शेख (३५), रुखसाना शेख (२६), फरहान शेख (१०) व सना दळवी (२७) या सगळ्या जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.