दादरला इमारतीत अग्निभडका ;वृद्धाचा मृत्यू

पालिकेच्या एफ उत्तर विभागाचे अधिकारी तपास करीत आहेत
दादरला इमारतीत अग्निभडका ;वृद्धाचा मृत्यू
Published on

मुंबई : दादर पूर्व येथील हिंदू कॉलनीतील रेन ट्री इमारतीच्या १३ व्या मजल्यावरील १३०२ क्रमांक फ्लॅटमध्ये आग लागली. या आगीमुळे इमारतीत धुराचे लोट पसरले. या दुर्घटनेत १३ व्या मजल्यावर अडकलेले सचिन पाटेकर (६०) यांना सुखरूप बाहेर काढले. परंतु, धुराचा त्रास झाल्याने त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान पाटेकर यांचा मृत्यू झाल्याचे सायन रुग्णालयाचे डॉ. राज भोर यांनी सांगितले. ही इमारत १० वर्षें जुनी असून इमारतीत २०० हून अधिक रहिवासी राहतात.

दादर पूर्व हिंदू कॉलनी, गल्ली नंबर २ येथे रेन ट्री ही तळ अधिक १५ मजली इमारत आहे. या इमारतीच्या १३ व्या मजल्यावरील १३०२ घरात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काही वेळातच आग सर्वत्र पसरली आणि इमारतीत धुराचे लोट पसरले. यावेळी १३ व्या मजल्यावर भाड्याने राहणारे सचिन पाटेकर अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, त्यांना धुराचा त्रास झाल्याने सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने डॉ. भोर यांनी सांगितले. दरम्यान, या घटनेची स्थानिक पोलीस, पालिकेच्या एफ उत्तर विभागाचे अधिकारी तपास करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in