आग्रीपाडा येथील २१ मजली इमारतीत आग; सुदैवाने कोणीही जखमी नाही

अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून बचावकार्य सुरू केले.
आग्रीपाडा येथील २१ मजली इमारतीत आग; सुदैवाने कोणीही जखमी नाही

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील आग्रीपाडा पोलीस स्टेशनजवळ असलेल्या २१ मजली इमारतीला सोमवारी सकाळी आठच्या सुमारास आग लागली. इमारतीच्या इलेक्ट्रिक डक्टमध्ये लागलेली ही आग काही क्षणात भडकल्याने इमारतीत धुराचे लोट पसरले. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून बचावकार्य सुरू केले. सुमारे दोन तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

मुंबईतील आग्रीपाडा येथील जहांगीर बोमन मार्गावरील एका २१ मजली इमारतीला सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास भीषण आग लागली. चौथ्या मजल्यावरील डक्टमध्ये लागलेली आग काही वेळातच इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत पसरली. धुराचे लोट इमारतीत पसरू लागले. अनेक रहिवाशांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीबाहेर धाव घेतली. अग्निशमन दलाने तत्काळ बचावकार्य हाती घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. वीजेच्या तारा आगीच्या संपर्कात आल्यामुळे आगीचा भडका उडाला. अग्निशमन दलाने आग अधिक पसरू नये यासाठी पाण्याचा मारा व इतर यंत्रणांचा वापर सुरू केला.

दोन तासानंतर म्हणजे ९.५० मिनिटांनी अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, आगीमुळे इमारतीतील विद्युत यंत्रणा, विद्युत तारा आगीत जळून खाक झाल्या. आगीच्या घटनेची स्थानिक पोलिस, अग्निशमन यंत्रणेकडून चौकशी केली जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in