मुंबई : अवघ्या महिन्याभरापूर्वी प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या ‘मेट्रो-३’ मार्गिकेवरील भुयारी बीकेसी मेट्रो स्थानकात शुक्रवारी आगडोंब उसळला. जमिनीपासून ३० ते ४० फूट खोलीवर ही घटना घडली. या आगीमुळे स्थानकात धूर पसरला. खबरदारीचा उपाय म्हणून प्रवाशांना स्थानकाबाहेर काढण्यात आले व वाहतूक थांबविण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर अग्निशमन दलाने मेट्रो सेवा सुरू करण्याची परवानगी दिली. त्यानंतर तब्बल पावणेदोन तासांनी या मार्गावरील सेवा पूर्ववत करण्यात आली.
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा पहिल्या टप्पा मागील ८ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिला टप्पा खुला करण्यात आला होता. यानंतरही पहिल्या टप्यातील बीकेसी स्थानकातील ए ४ प्रवेशद्वाराचे काम अद्यापही सुरू आहे. हे प्रवेशद्वार अद्याप खुले करण्यात आलेले नाही. या प्रवेशद्वाराजवळ सुमारे ४० ते ५० फूट खोल तळघरात बांधकाम साहित्य, लाकडी साठा आणि फर्निचर असलेल्या ठिकाणी शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यातून निघालेला धूर बीकेसी स्थानकात घुसला. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बीकेसी स्थानकातील मेट्रो सेवा तातडीने बंद करून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेतले. या घटनेमुळे परिसरात वाहतूककोंडी झाली होती.
काही दिवसांपूर्वीच तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना भूमिगत स्थानकात अडकून पडावे लागले होते. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी बीकेसी स्थानकात लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बीकेसी स्थानकातील सेवा सुमारे १ वाजता बंद करण्यात आली होती. ही सेवा अग्निशमन अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतर दुपारी २.४५ वाजता सुरू करण्यात आली. या कालावधीत आरे- जे.वी.एल.आर. ते वांद्रे कॉलनी दरम्यानची मेट्रो सेवा नेहमीप्रमाणे सुरू होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल एमएमआरसी प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
तांत्रिक दोष दूर करा
मेट्रोच्या डब्यातील इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये तांत्रिक दोष असल्याने गाडी सुरू असताना एमसीबी ट्रीप होऊन एसी आणि इंडिकेटर बंद होतात. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम तपासून दोष दूर करण्याची विनंती एका प्रवाशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. याबाबतची पोस्ट या प्रवाशाने एक्सवरून एमएमआरसीला केली आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बीकेसी स्थानकावरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आली होती. अग्निशमन दलाने आग पूर्ण विझविल्यानंतर आणि मेट्रो सेवा सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर बीकेसी स्थानकावरील सेवा दुपारी २.४५ वाजता सुरू करण्यात आली.
- एमएमआरसी प्रवक्ते