गोरेगावमधील आग सिगारेटमुळे! समितीच्या सर्वेक्षणात माहिती समोर

या घटनेत आणखी एकाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ८ वर पोहोचली आहे.
गोरेगावमधील आग सिगारेटमुळे! समितीच्या सर्वेक्षणात माहिती समोर

मुंबई : गोरेगाव पश्चिम उन्नतनगर येथील जयभवानी इमारतीतील पार्किंगमध्ये लागलेल्या आगीस जळते सिगारेट कारणीभूत ठरले आहे. आठ सदस्यीय समितीने केलेल्या सर्वेक्षणात हा ठपका ठेवण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, आगीच्या घटना रोखण्यासाठी विशेष करून एसआरए इमारतीत बाहेरून जिना देण्यात यावा, अशाप्रकारच्या शिफारशी समितीने केल्या आहेत. दरम्यान, सात मजली इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणे बंधनकारक असेल, अशी समितीने शिफारस केली आहे. दरम्यान या घटनेत आणखी एकाचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ८ वर पोहोचली आहे.

जय भवानी इमारतीत ६ ऑक्टोबरला मध्यरात्री लागलेल्या आगीत ८ जणांचा मृत्यू झाला तर ५१ रहिवासी जखमी झाले. ही आग कशी लागली, याचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत. या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीची दुसरी बैठक सोमवारी पालिका मुख्यालयात झाली.

इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगमध्ये चिंधी, कपडे गोळा करणाऱ्या लहान व्यावसायिकांनी आपली कपड्यांची गाठोडी मोठ्या प्रमाणात ठेवली होती. दर शुक्रवारी व्यावसायिक व्यवसायासाठी बाहेर जाताना गाठोडी घेऊन जातात. या गाठोड्यांजवळ अज्ञात व्यक्तीने टाकलेल्या सिगारेटच्या थोटक्यामुळे ही आग लागली व इमारतीत पसरली. आगीला या व्यावसायिकांचा निष्काळजीपणा भोवला असल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.

अहवालातील शिफारशी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआरए इमारतींमध्ये आपत्कालीन मदतीसाठी बाहेरून लोखंडी शिड्या लावण्याची सूचना केली आहे. त्याची अंमलबजावणी करावी

- सर्व एसआरए इमारतींचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- २४ मीटरपर्यंतच्या इमारतींना अग्निसुरक्षा यंत्रणा, अग्निशमन परवानग्या आतापर्यंत बंधनकारक नव्हत्या. यापुढे सर्व एसआरए इमारतींना या यंत्रणा व परवानग्या घ्याव्या लागणार आहेत.

- एसआरए इमारतींच्या पुनर्विकासात आधीपेक्षा जिन्यांची लांबी, रूंदी, आकार मोठा ठेवण्यात यावा

- सर्व एसआरए तसेच कमी मजल्याच्या इमारतींना अग्निशमन दल तपासणी, अग्निशामक यंत्रणेचा 'बी फार्म' भरणे आवश्यक

- बहुमजली इमारतींमधील वायरिंग आणि अग्निशामक यंत्रणांची पाहणी मोहीम सुरू करावी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in