मुंबई : गोरेगाव पश्चिम उन्नत नगर येथील जयभवानी इमारतीतील पार्किंगमध्ये ६ ऑक्टोबरला अग्नी भडका उडाला तो जळते सिगारेटचे तुकडे फेकल्याने, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या आठ सदस्यीय समितीने या आगीचा अहवाल पालिका आयुक्तांना सादर केला असून, समितीने भविष्यात आगीच्या घटना टाळण्यासाठी १५ उपाययोजना सूचवल्या आहेत.
गोरेगाव उन्नत नगर, गोरेगाव (पश्चिम) जय भवानी एस. आर. ए. को - ऑपरेटिव्ह सोसायटी येथे लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ५१ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाला दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त यांनी प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठीचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना दिले होते. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली होती.
समितीमध्ये महापालिका अधिकारी, पोलीस, झोपडपट्टी पुनर्वसन, अग्निशमन अधिकारी, म्हाडा आदी प्राधिकरण आणि यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. या समितीने आपला अहवाल पालिका आयुक्तांना सादर केला आहे. भविष्यात आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत समितीने शिफारसी केल्या आहेत.
जयभवानी इमारतीतील पार्किंगमध्ये इलेक्ट्रिक वायरिंग नाही. या पार्किंग मध्ये कपडे घेऊन भाडी देणारी लोकांची ये-जा असते. तसेच काही असामाजिक तत्वांची उठबस असून, याठिकाणी चरस गांजा, सिगारेट ओढणे हे सुरू असल्याचे चौकशीत निदर्शनास आले आहे. जयभवानी इमारतीत लागलेली आग जळते सिगारेटचे तुकडे फेकल्याने लागली, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
समितीने केलेल्या काही शिफारसी
- इमारतींमधील रहिवाशांना आगीच्या घटनेच्या वेळी सुरक्षितपणे इमारतींमधून बाहेर पडण्याच्या दृष्टीने प्रमुख अग्निशमन अधिकारी यांनी सुचविलेल्या ठिकाणी आवर्त शिडीची उभारणी करण्यात यावी.
- इमारतीत 'फायर ऑडीट करुन घेऊन' त्यांनी निदर्शनास आणलेल्या आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनेतील त्रुटींची पूर्तता लायसन्सप्राप्त अभिकरणांमार्फत करण्यात यावे.
- ''आग व जीव सुरक्षा लेखापरिक्षक'' यांच्यामार्फत 'फायर ऑडीट करुन घेऊन' त्यांनी निदर्शनास आणलेल्या आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनेतील त्रुटींची पूर्तता लायसन्सप्राप्त अभिकरणांमार्फत तात्काळ करुन घेण्यात यावी.
- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी मंजूर केलेल्या २२७ इमारतींचे नियमित फायर ऑडीट करणे आवश्यक आहे. सदर फायर ऑडीट प्रत्येक वर्षी जून महिन्यात आग व जीवसुरक्षा लेखापरिक्षक यांच्यामार्फत विकासकाने/सोसायटीने स्वखर्चाने करणे आवश्यक आहे.
- पुनर्वसन इमारतीबाबतीत सद्यस्थितीत ३ वर्षांसाठी असलेला दोषदायित्व कालावधी १० वर्षाचा करण्यात यावा.
- विकासकाने इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर सामान्य खुली जागा आणि एकापेक्षा अधिक जिन्यांची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे सदर जिन्यांची रुंदी २ मीटरपेक्षा जास्त ठेवणे सक्तीचे करण्यात यावे.