
मुंबईतील गोरेगाव फिल्मसीटीमध्ये असलेल्या एका हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच, मालिकेचे चित्रीकरण सुरु असताना लागलेल्या या आगीतून काही कलाकारांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, काही कलाकार या आगीमध्ये अडकल्याची भीती असून अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, 'गुम है किसी के प्यार मै' या हिंदी मालिकेच्या सेटवर ही आग लागली आहे. असे सांगण्यात येते की, याठिकाणी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरमुळे ही आग लागली असावी. दरम्यान, हा संपूर्ण सेट लाकडी असून या आगीत संपूर्ण सेट जळून खाक झाला. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.