फायर रोबो ठरतोय आकर्षण; सीएसएमटी स्थानकात अग्निशमन दलाची जनजागृती

...म्हणून पाळला जातो ‘अग्नी सेवा दिन’
फायर रोबो ठरतोय आकर्षण; सीएसएमटी स्थानकात अग्निशमन दलाची जनजागृती
Published on

मुंबई : १४ एप्रिल १९४४ मध्ये एस. एस. फोर्ट स्टिकीन' या बोटीमधील दारुगोळ्याच्या स्फोट झाला आणि ४४ जवान शहीद झाले. वीरगती प्राप्त जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी १४ ते २० एप्रिल दरम्यान अग्नी सेवा दिन पाळला जातो. या दिनानिमित्त शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलाट क्रमांक ९ व पोलीस चौकीजवळ लोकांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात आली. यावेळी प्रदर्शनात मांडलेला फायर रोबो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आकर्षण ठरला आहे.

पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनानुसार अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने मुंबई अग्निशमन दलाबाबत नागरिकांना प्रत्यक्ष माहिती व्हावी आणि अग्निशमन दलात असणारी अत्याधुनिक उपकरणे जवळून बघता यावीत, या हेतूने मुंबई अग्निशमनदलातर्फे विविध ठिकाणी विशेष जनजागृती प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात फायर रोबोसह वॉटर मिस्ट, व्हिक्टिम लोकेशन कॅमेरा, रेस्क्यू ट्रायपॉड स्टॅन्ड, कॉम्बिनेशन टूल यासारखी अत्याधुनिक व महत्त्वाची उपकरणे ठेवण्यात आली. त्याचबरोबर मुंबई अग्निशमन दलाचा इतिहास आणि कर्तव्ये याबाबत माहितीपूर्ण फलक या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आले. हे जनजागृती प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणासोबतच कुर्ला व मालाड येथेही आयोजित करण्यात आले, असेही मुंबई अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

...म्हणून पाळला जातो ‘अग्नी सेवा दिन’

१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरात 'एस. एस. फोर्ट स्टिकीन' या बोटीमधील दारुगोळ्याच्या साठ्याने पेट घेतला. त्यानंतर उसळलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी व जवानांना वीरगती प्राप्त झाली. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी १४ एप्रिल रोजी देशभरात ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ पाळला जातो. तसेच दरवर्षी १४ ते २० एप्रिल यादरम्यान अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो. याच अनुषंगाने यंदा मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी जनजागृतीपर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in