धोका पत्करून मुंबईकरांच्या सेवेत सदैव तत्पर!

दरवर्षी १४ एप्रिल रोजी अग्निशमन सेवा दिन पाळला जातो. मात्र त्यानंतर पुन्हा वर्षभर शहीद झालेल्यांचा जवानांचा विसर पडतो किंवा त्यांची आठवण काढायला वेळ मिळत नसावा.
धोका पत्करून मुंबईकरांच्या सेवेत सदैव तत्पर!

हॅलो, अमुक-अमुक ठिकाणी आग लागली, इमारत कोसळली, तारेत पक्षी अडकला, पहिला फोन खणखणतो तो मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाचा. घटनेची माहिती मिळताच अडकलेल्यांना सुखरुप वाचवणे ही लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून जवान आपली जबाबदारी पार पाडत असतो. मात्र याच जिगरबाज जवानांच्या व्यथा, तोकड्या सुविधा, सुरक्षा याचा विचार करणेही गरजेचे आहे. परंतु दुसऱ्याचा जीव वाचवणे हेच उद्दीष्ट ठेवणाऱ्या जवानांचे जीवन धोक्याचे, तरी मुंबईकरांसाठी सदैव सेवेत तत्पर.

१४ एप्रिल, १९४४ रोजी मुंबई बंदरात ‘एस. एस. फोर्ट स्टिकीन’ या बोटीतील दारु-गोळ्याच्या साठ्यात स्फोट झाला आणि त्यानंतर उसळलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविताना मुंबई अग्निशमन दलातील एकूण ६६ अधिकारी व जवानांना वीरगती प्राप्त झाली. या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी १४ एप्रिल रोजी देशभरात ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ पाळला जातो. भायखळा येथील मुंबई अग्निशमन दल मुख्यालयात १४ एप्रिल रोजी अग्निशमन सेवा दिन सोहळा साजरा होतो. मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने सेवा बजावताना आजवर शहीद अधिकारी आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताहाचे आयोजन केले जाते.

दरवर्षी १४ एप्रिल रोजी अग्निशमन सेवा दिन पाळला जातो. मात्र त्यानंतर पुन्हा वर्षभर शहीद झालेल्यांचा जवानांचा विसर पडतो किंवा त्यांची आठवण काढायला वेळ मिळत नसावा. मुंबई बंदरात १९४४ साली आगडोंब उसळला तशी घटना पुन्हा घडू नये ही सर्वांची इच्छा. मात्र अनेक घटना अचानक घडतात आणि त्या घटनांमध्ये होत्याचे नव्हते झाले, अशी अनेक उदाहरणे आहेत. बोरिवली येथील गोयल शॉपिंग सेंटरमध्ये अग्नी भडका उडाला आणि जवानाच्या जीवावर बेतले. काळबादेवी येथील गोकुळ निवास इमारतीत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना तीन बड्या अधिकाऱ्यांना मुंबई अग्निशमन दलाने गमावले. मुंबईत आजही आगीचे सत्र सुरू असून भविष्यात आगीच्या घटना घडणार नाहीत, हे सांगणे कठीण. मात्र मुंबईत कुठलीही आपत्कालीन परिस्थितीत ओढावली तर मुंबई अग्निशमन दलाचे जवान मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी खंबीरपणे उभे असतील हेही तितकेच खरे.

आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत आहे. उत्तुंग टॉवर, गगनचुंबी इमारती, मॉल, व्यवसायिक इमारती उभ्या होत आहेत. मुंबईचा विकास ज्या झपाट्याने होत आहे, त्याच वेगाने मुंबईत दुर्घटनांच्या प्रमाण वाढ झाली आहे. मात्र आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकरांचा जीव वाचवण्यासह मालमत्तेचे नुकसान टाळणाऱ्या मुंबई अग्निशमन दलाचा तितक्या झपाट्याने विकास झालेला नाही. जगात उच्च तंत्रज्ञान विकसीत झाले असून मुंबई महापालिकेने याआधीच विकसीत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात करणे अपेक्षित होते. आता हळुवार मुंबई अग्निशमन दलाचा कायापालट होत असून मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दल नवी उभारी घेत आहे. मुंबईचा विकास झपाट्याने होत आहे, त्याच प्रमाणे अग्निशमन दलाचा विकास करणे काळाची गरज आहे.

मुंबईची लोकसंख्या दीड कोटींची घरात पोहोचली आहे. मात्र मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी ४० हजार पोलीस तर जीव वाचवणाऱ्या अग्निशमन दलात फक्त अडीच हजार अधिकारी व जवान चोख सेवा बजावत आहेत. मात्र त्यांना मिळणाऱ्या सुविधा तोकड्या असून अधिकाधिक सुविधा पुरवणे गरजेचे आहे. मुंबईत एखादी घटना घडल्यानंतर अग्निशमन दल वेळेत पोहोचले नाही, अशी टीका केली जाते. मात्र वाहतूक कोंडी, ठिकठिकाणी खोदलेले रस्ते यामुळे जवान घटनास्थळी वेळेत पोहोचत नाही, याचाही विचार करणे गरजेचे आहे. अग्निशमन दल अधिक सक्षम करणे काळाची गरज आहे. अन्यथा घटना घडत राहणार आणि जवानांना जीव गमवावा लागत राहणार, हेही तितकेच खरे.

मुंबईचा झपाट्याने औद्योगिक आणि नागरी विकास होत असताना नागरी सुविधांवर निश्चितच ताण येतो. आगीसारख्या दुर्घटना घडल्यास जागरूकता न दाखवता केवळ पळून जाणे हाच पर्याय स्विकारला जात असल्याने दुर्घटनेची तीव्रता वाढते. मुंबईकरांमध्ये जनजागृती, प्रशिक्षण, संवाद, नियंत्रण आणि बचावाचे धडे अशी ‘पंचसूत्री’ वापरून मुंबईला ‘अग्निसाक्षर’ करण्याचे उद्दिष्ट्य ठेवून काम करणे गरजेचे आहे. मोठमोठ्या आस्थापनांमध्ये शेकडो जण काम करतात, लाखो रुपयांच्या मालमत्ता तरीही अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याकडे मात्र मालक-चालकांकडून दुर्लक्ष केल्याचे दुर्घटनेनंतर निदर्शनास येते. अग्निशमन दलाकडून वेळोवेळी आस्थापना-सोसायट्यांची तपासणी करून अग्निशमन यंत्रणा नसल्यास नोटीसही दिली जाते. परंतु ये-रे माझ्या मागल्या म्हणीप्रमाणे ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असा कारभार पहावयास मिळतो. त्यामुळे मुंबईत आगीच्या घटनांना बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा कारणीभूत ठरतो आणि जीव वाचवणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या जीवावर बेतते.

गेल्या काही वर्षांत मुंबईचा विकास होत असून मुंगीलाही पाय ठेवायला जागा शिल्लक नाही, इतक्या वेगाने विकासाची लोकल सुसाट निघाली आहे. घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईचा वेग कधी मंदावेल, कोणचं सांगू शकत नाही. मुंबईची ज्या झपाट्याने प्रगती होत आहे, त्याच वेगाने मुत्यूचा सापळा रचला जात आहे. मुंबईत पाऊल ठेऊ तेथे धोकाच धोका आहे. झाड किंवा झाडाची फांदी अंगावर पडून मुत्यू, तर कधी इमारत अथवा इमारतीचे छत कोसळून, तर धोकादायक पुलाखालचा व पुलावरचा जीवघेणा प्रवास, कधी रस्ता खचणे, दरड कोसळणे, आगडोंब उसळणे अशी नाना प्रकारची मुत्यूची दारे उडली असून ती उघडण्यामागे संबंधित यंत्रणाचं जबाबदार आहेत. कामा निमित्त घरातून बाहेर पडल्यावर पुन्हा घरी परतू कि नाही, याची शाश्वती कोणच देऊ शकत नाही. त्यामुळे आजच्या घडीला मायानगरी मुंबईचा प्रवास हा जीवघेणा होत आहे. मात्र मुंबई अग्निशमन दलाचे जवान आजही मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी खंबीरपणे उभे ठाकले आहेत. आजवर अनेक घटनांमध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान शहीद झाले. मात्र सध्या कार्यरत अडीच हजार अधिकारी व जवान तितक्याच ताकदीने मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर आहेत.

मुंबई अग्निशमन दलात डिसेंबर २०२३ पर्यंत नवीन ९१० अधिकारी व जवान सेवेत येतील आणि अग्निशमन दलाची ताकद वाढेल. मात्र मुंबई महापालिका प्रशासनाने अधिकारी व जवानांचे मनोबल वाढीसाठी आणि तरुण पिढीला अग्निशमन दलाच्या सेवेत रुजू होण्याची इच्छा व्हावी यासाठी जनजागृती पर विशेष मोहीम राबवणे गरजेचे आहे. सेवेत रुजू होण्याआधी अधिकारी व जवानांना कामाप्रती प्रतिज्ञापत्रही लिहून द्यावे लागते आणि ती त्याची जबाबदारीच आहे. परंतु तेही कोणाचे तरी नातेवाईक असून त्यांच्याही आशा अपेक्षा आहेतच ना. त्यामुळे अग्निशमन दल अधिक हायटेक करत जवानांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या, तर मुंबईकरांचा जीव वाचवणे अधिक शक्य होईल आणि जवानांचा कामाप्रती उत्साह वाढेल.

मुंबई अग्निशमन दलाचे सामर्थ्य

* २३८८ प्रशिक्षित जवान

* २७० पेक्षा अधिक सुसज्ज वाहने

* आधुनिक साहित्य

* ६ प्रशासकीय परिमंडळ

* ३५ अग्निशमन केंद्र

* १९ लघू अग्निशमन केंद्र

आपली जबाबदारी काय?

आपण राहत असलेल्या घरातील वस्तूंची, सोने-चांदी याची काळजी आपण वेळोवेळी घेतो, त्याप्रमाणे आपल्या जीवाची काळजी घेत घरातील इलेक्ट्रीक वायरींग योग्य आहे की, नाही याची काळजी घेणे आपलीच जबाबदारी, अन्यथा ‘नजर हटी दुर्घटना घटी’ हे होतच राहणार.

logo
marathi.freepressjournal.in