
यंदा दिवाळीत आतषबाजीला जोर आला आहे. दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होत असताना फटाक्यांच्या खरेदी-विक्रीलाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. यामुळे यावर्षी फटाक्यांच्या किमतीत ४० ते ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. तरी देखील बाजारात फटक्यांच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.
देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात सुरू आहे. सर्वत्र विविध वस्तूंचे बाजार फुलले असून, यामध्ये यंदा विशेष आकर्षणाचा विषय ठरत आहे ते म्हणजे फटाके. मुंबईसह सर्वच शहरात मोठ्या प्रमाणावर फटाके विक्री सुरू आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच फटाक्यांच्या दुकानांत गर्दी करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बेरियम नायट्रेटच्या वापरावर निर्बंध घातल्याने उत्पादन ४० टक्क्यांनी घटले आहे. तर फटाके बनवण्यासाठी बेरियम नायट्रेटबरोबरच अमोनियम नायट्रेट, अॅल्युमिनियम पावडर, कॉपर कोटेड वायर, सल्फर, रद्दी पेपर, सुतळी अशा कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. परिणामी फटाक्यांच्या किमती ४० ते ५० टक्क्यांनी महागल्या आहेत. मात्र सर्वच शहरात फटाका बाजार गजबजले असताना ग्राहकांकडून किंमतीचा विचार न करता उत्साहात खरेदी सुरू आहे. फटाक्यात सुरसुरी, भुईचक्र, पाऊस, आपटी बॉम्ब, रॉकेट या पारंपरिक फटाक्यांसह बाजारात अनेक नवे फटाके आले आहेत. आकाशात उडणाऱ्या ‘शॉट्स फटाक्या’त विविध प्रकार आल्याचे फटाके व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. आकाशात उडणाऱ्या फटाक्यांमध्ये नवनवे प्रकार आले असून उंच आकाशात दीर्घकाळ प्रकाशमान राहणारे फटाके यंदाचे आकर्षण ठरत आहे.