कोणतेही आव्हान आले तरी अग्निशमन दलाने मागे हटू नये; दुर्घटनेत प्रत्येक क्षण महत्त्वाचा, मुंबई महापालिका आपल्या पाठीशी - अमित सैनी

मुंबईत जितक्या उंच इमारती आहेत, तितक्याच अरुंद गल्ल्याही आहेत. त्यामुळे जेव्हा दुर्घटना घडते, तेव्हा या दोन्ही पातळींवरील आव्हान पेलण्यास मुंबई अग्निशमन दल सज्ज असते.
कोणतेही आव्हान आले तरी अग्निशमन दलाने मागे हटू नये; दुर्घटनेत प्रत्येक क्षण महत्त्वाचा, मुंबई महापालिका आपल्या पाठीशी - अमित सैनी

मुंबई : सैन्यदलातील तत्परता, निर्णयक्षमता, एकीचे बळ मी खूप जवळून पाहिले आहे. तसाच अनुभव या स्पर्धा पाहताना आला. सीमेवर प्रत्येक जीव वाचविण्यासाठी सांघिक प्रयत्न खूप गरजेचे असतात. त्याचप्रमाणे मुंबईसारख्या शहरात जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हाही प्रत्येक क्षणाला खूप महत्त्व असते. मानव आणि यंत्र यातील समन्वय जितका योग्य असणार, तितकीच प्रत्येक मोहीम यशस्वी ठरणार, अशा प्रकारचा मोलाचा सल्ला सैनी यांनी जवानांना दिला. कोणतेही आव्हान आले तरी, मागे हटू नका. पालिका सतत मुंबई अग्निशमन दलाच्या पाठीशी असेल, असा विश्वास अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी व्यक्त केला.

मुंबईत जितक्या उंच इमारती आहेत, तितक्याच अरुंद गल्ल्याही आहेत. त्यामुळे जेव्हा दुर्घटना घडते, तेव्हा या दोन्ही पातळींवरील आव्हान पेलण्यास मुंबई अग्निशमन दल सज्ज असते. अग्निशमन कवायती पाहताना प्रत्येक अधिकारी आणि जवानांतील समन्वय, बळ, सांघिक प्रयत्न अतिशय कौतुकास्पद वाटले. हाच समन्वय प्रत्यक्ष घटनास्थळी कायम ठेवावा, अशी अपेक्षा डॉ. अमित सैनी यांनी व्यक्त केली. मुंबई अग्निशमन दलाअंतर्गत वार्षिक अग्निकवायत स्पर्धा-२०२४ची अंतिम फेरी भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपआयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, मुंबई पोर्ट ट्रस्टचे प्रमुख अग्निशमन अधिकारी इंद्रजीत चढ्ढा यांच्यासह अग्निशमन दलाचे अधिकारी व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मुंबई अग्निशमन दल म्हणजे महानगरपालिकेच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. या दलाची सज्जता कौतुकास्पद आहे. अग्निशमन दलाच्या अडचणी सोडविण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सतत पाठीशी आहे, असे उपायुक्त प्रशांत गायकवाड म्हणाले.

प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अग्निशामक विनायक देशमुख यांनी लिहिलेले ‘शौर्यम्’ या पुस्तकाचे प्रकाशन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते करण्यात आले.

यांचा सन्मान!

राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण अग्निशमन सेवापदक प्राप्त उपप्रमुख अग्निशमन अधिकारी हरिश्चंद्र शेट्टी, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी अनिल परब, विभागीय अग्निशमन अधिकारी देवेंद्र पाटील, दुय्यम अधिकारी राजाराम कुदळे, प्रमुख अग्निशामक किशोर म्हात्रे, प्रमुख अग्निशामक मुरलीधर आंधळे यांचाही डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून वडाळा प्रशिक्षण केंद्रातील अविनाश शिर्के यांचा सन्मान करण्यात आला.

फायर पंप ड्रिल स्पर्धा

  • प्रथम क्रमांक - कांदिवली अग्निशमन केंद्र

  • द्वितीय क्रमांक - भायखळा अग्निशमन केंद्र

  • तृतीय क्रमांक - कांदरपाडा अग्निशमन केंद्र

ट्रिपल एक्सटेन्शन लॅडर मोटर पंप ड्रिल स्पर्धा

  • प्रथम क्रमांक - बोरिवली अग्निशमन केंद्र

  • द्वितीय क्रमांक - भायखळा अग्निशमन केंद्र

  • तृतीय क्रमांक - फोर्ट अग्निशमन केंद्र

सर्वोत्कृष्ट संघ

बोरिवली अग्निशमन केंद्र

सर्वोत्कृष्ट अग्निशामक

विठ्ठल सावंत, यंत्रचालक

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in