
मुंबई पश्चिम उपनगरातील कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या लालजी पाडा परिसरात आज (28 मे) सकाळी आठ वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणाने झाला, ते अद्याप समजू शकले नाही. गोळीबारानंतर आरोपी पसार झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करुन तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याठिकाणी मागील सहा महिन्याच्या काळात ही दुसरी घटना आहे. या आधी या ठिकाणी 1 ऑक्टोंबर 2022 रोजी गोळीबार झाला होता.
या गोळीबारात गोळी लागून मृत पावलेला तरुण हा या परिसरात टँकरने पाणी विक्रीसा व्यवसाय करत होता. व्यवसायाच्या वादातून त्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. कांदिवली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मागील वर्षी ऑक्टोंबर महिन्यात याच परिसरात मध्यरात्री अचानक गोळीबार करण्यात आला होता. यावेळी तब्बल चार राऊंड फायरिंग झाली होती. यावेळी देखील एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले होते. परस्पांमध्ये असलेल्या वादातून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. याप्रकरणात कांदिवली पोलिसांनी दोन आरोपींना गुरजरातमधून अटक केली होती.
गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ
सध्या गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. साधारण महिन्याभरापूर्वी मुंबईतील अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत अंधेरी-कुर्ला रोडवरील हॉटेल विरा रेसिडेन्सीचे मालक यांच्यावर गोळीबार करुन त्यांचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची सुत्रे फिरवत 10 ते 12 वेगवेगळ्या टीम बनवून आरोपीचा शोध सुरु केला होता. पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपींना अटक करुन हॉटेलच्या मालकाची सुखरुप सुटका केली होती.