मुंबई : मुंबईत मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास भायखळा पोलीस हद्दीतील माझगाव सर्कलजवळ दुचाकीवरून दोन अज्ञात इसमांनी गोळीबार करून तेथून पळ काढला. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जखमी झालेल्या व्यक्तीवर गुटखा पुरवल्याप्रकरणी एकूण चार गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी रात्री उशिरा शिवदास चपसी रोडजवळील केजीएन फर्निशिंग नावाच्या दुकानाबाहेर तीन जण बाकावर बसले असताना एका अॅक्टिव्हावर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर एक राऊंड गोळीबार केला.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गोळी झाडलेली गोळी आधी सिमेंट ब्लॉकला लागली आणि नंतर तक्रारदार मौसीन सलमानी (३३) यांच्या पायाच्या बोटाला लागली. त्यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तिथे बसलेले हे तिघे गुटखा पुरवठा करतात. गोळीबाराचे लक्ष्य कोण होते, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. या गोळीबाराचे कारण अद्याप समोर आले नसले तरी दहशत पसरवण्यासाठी गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
हल्लेखोर अॅक्टिव्हावरून आले, त्यांनी एक राऊंड फायर केला आणि रे रोडच्या दिशेने निघाले. पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. सूत्राने सांगितले की, अॅक्टिव्हाच्या मागे बसलेल्या व्यक्तीने गोळीबार केला तेव्हा पिस्तुलाचे मॅगझिन खाली पडल्याने एक राऊंड फायर झाला. या गोळीबाराच्या तपासासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली असून, मुंबई गुन्हे शाखाही त्याच्या तपासात गुंतली आहे.