सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, गुन्हे शाखा-एटीएसकडून आरोपींचा शोध सुरू; बिष्णोई टोळीने जबाबदारी स्वीकारली?

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ रविवारी सकाळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला.
सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, गुन्हे शाखा-एटीएसकडून आरोपींचा शोध सुरू;
बिष्णोई टोळीने जबाबदारी स्वीकारली?

मुंबई : बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ रविवारी सकाळी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला. गोळीबारानंतर दोन्ही मारेकरी मोटारसायकलवरून पळून गेले. या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसले तरी या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बिष्णोई टोळीकडून हा गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत हल्लेखोरांच्या अटकेसाठी गुन्हे शाखेसह एटीएसला स्वतंत्रपणे शोधमोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसच्या वीसहून अधिक पथकांनी हल्लेखोरांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

सलमान खान हा त्याच्या कुटुंबीयांसह वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याला यापूर्वीही लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे त्याला यापूर्वीच ‘वाय’ सुरक्षा देण्यात आली होती. रविवारी सकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेने हवेत चार ते पाच गोळ्या फायर केल्या. त्यातील एक गोळी सलमानच्या घराला लागली होती. यावेळी सलमान हा त्याच्या घरी होता. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, गोळीबाराच्या आवाजाने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.

ही माहिती नंतर स्थानिक रहिवाशांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला दिली. ही माहिती मिळताच वांद्रे पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी हवेत गोळीबार करून पलायन केल्याचे आढळले. त्यांच्याकडील पिस्तूल विदेशी बनावटीचे होते. केवळ दशहत निर्माण करण्यासाठी हल्लेखोरांनी हवेत चार ते पाच गोळ्या फायर केल्या. गोळीबारानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजमध्ये दोन्ही आरोपी पळून जाताना दिसत आहेत. या दोघांनी हेल्मेट घातले होते. त्यांच्या मोटारसायकलचा क्रमांक दिसून आला नाही. गोळीबाराच्या वेळेस गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये चार सुरक्षारक्षक कर्तव्य बजावत होते. त्यामुळे या चारही सुरक्षारक्षकांची पोलिसांकडून जबानी नोंदवून घेण्यात आली. गोळीबारानंतर घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला बोलाविण्यात आले होते. तिथे पोलिसांना रिकाम्या पुंगळ्या आणि एक जिवंत काडतुस सापडले. काडतुस लोड करताना खाली पडले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. गोळीबार कोणी केला, याबाबत काहीही माहिती समजू शकली नाही.

विरोधकांकडून शिंदे सरकार लक्ष्य

अभिनेते सलमान खानच्या घराबाहेर अज्ञातांनी गोळीबार केल्याप्रकरणी विरोधकांनी रविवारी सरकारला धारेवर धरले. खा. सुप्रिया सुळे यांनी तर ‘ट्रिपल इंजिन’ सरकारमधील कोणाचा तरी गुन्हेगारीला आशीर्वाद असल्याशिवाय हे होऊ शकत नाही असे सांगत, भररस्त्यावर गोळीबार होत असेल तर ‘अब की बार गोळीबार सरकार’ असे टीकास्त्र सोडले. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘हा गोळीबार केवळ इशारा नाही तर या बंदुकीच्या गोळ्यांनी भाजप व त्यांचे सरकार यांची पोलखोल केली आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. पण त्यांचे काम हे विरोधकांवर खोटे गुन्हे लावणे हेच आहे.

बिष्णोई टोळीने जबाबदारी स्वीकारली?

गोळीबारानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली असून त्यात बिष्णोई टोळीने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. या पोस्टची सत्यता पोलिसांकडून पडताळून पाहिली जात आहे. मात्र, पोलिसांकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नाही. सलमान खान हा बिष्णोई टोळीच्या टार्गेटवर आहे. यापूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांना बिष्णोई टोळीकडून धमकीचे एक पत्र मिळाले होते. त्यानंतर सलमानला अनेकदा या टोळीकडून जीवे मारण्याची धमकीसह मेल पाठविण्यात आले होते.

सलमानच्या जीवाला धोका असल्याने त्याला गृह विभागाने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिली होती. सहा वर्षांपूर्वी बिष्णोई टोळीने सलमानवर हल्ला करण्यासाठी काही शूटर मुंबईत पाठविले होते. गायक सिद्धू मुसेवालासोबत जे झाले तेच सलमानसोबत होणार असल्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

१९९८ साली राजस्थान येथे सलमान खान हा ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता. यावेळी त्याने एका काळवीटाची शिकार केली होती. बिष्णोई समाजात काळवीट पवित्र मानले जाते. त्यामुळे या टोळीने सलमानला टार्गेट केले होते.

आरोपींवर कडक कारवाई - मुख्यमंत्री

कोणत्याही प्रकारे गुन्हेगारांना पाठीशी घालण्यात येणार नसून पोलीस कडक कारवाई करतील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, सलमान खानच्या घराबाहेर जो गोळीबार झाला तो दुर्दैवी प्रकार आहे. मी स्वत: पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. सलमान खानशीही बोललो, त्याला दिलासा दिला आहे. कायदा हातात घेणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही. पोलीस कडक कारवाई करतील, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस योग्य ती कारवाई करत असून योग्यवेळी माहिती दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in