मुंबईत GBS चा पहिला रुग्ण; अंधेरी येथील ६४ वर्षीय महिलेला लागण

पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूरला विळखा घालणाऱ्या ‘जीबीएस’ आजाराने आता मुंबईकडे कूच केली आहे.
मुंबईत GBS चा पहिला रुग्ण; अंधेरी येथील ६४ वर्षीय महिलेला लागण
Published on

मुंबई : पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूरला विळखा घालणाऱ्या ‘जीबीएस’ आजाराने आता मुंबईकडे कूच केली आहे. मुंबईतील अंधेरी येथील मालपा डोंगरी येथे राहणाऱ्या ६४ वर्षीय महिलेला ‘जीबीएस’ आजाराचे निदान झाले असून तिला मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या महिलेची प्रकृती स्थिर असून मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, राज्यात ‘जीबीएस’ रुग्णांची संख्या १८० वर गेली असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ‘गुलेन बॅरे सिंड्रोम’ म्हणजेच जीबीएस. ‘जीबीएस’ आजार थेट मज्जातंतूवर परिणाम करतो. ‘जीबीएस’ आजाराचा पुणे, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यांत झपाट्याने फैलाव होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडला ‘जीबीएस’ आजाराने विळखा घातला आहे. दररोज नवीन रुग्णांची नोंद होत असून राज्य सरकारचा आरोग्य विभाग दक्ष झाला आहे. काळजी घ्यावी, घाबरू नका, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, आता मुंबईतही ‘जीबीएस’ आजाराचा शिरकाव झाला आहे.

जीबीएस होण्याची कारणे

बॅक्टेरियल, व्हायरल इन्फेक्शन, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे आणि दूषित पाणी पिणे यामुळे हा आजार होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता बाळगावी आणि कोणतीही लक्षणे दिसल्यास पालिका किंवा इतर दवाखान्यात डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

‘जीबीएस’ची लक्षणे

‘जीबीएस’ आजारात माणसाच्या मज्जातंतूवर विषाणू हल्ला करतो. त्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारशक्तीच कमी होते. शिवाय मेंदूकडून इतर अवयवांना मिळणारे संकेत कमी होतात. यामध्ये स्नायूदेखील कमकुवत होतात. हातापायातील संवेदना कमी होऊ शकतात. गिळण्यास किंवा श्वास घेताना त्रास, हातापायांना मुंग्या येणे, दम लागणे, अशी लक्षणे यामध्ये दिसतात.

logo
marathi.freepressjournal.in