बाळासाहेबांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण; दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी कंत्राटदाराची नेमणूक लवकरच

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) दादर येथील महापौर निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे.
बाळासाहेबांच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण; दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी कंत्राटदाराची नेमणूक लवकरच
एक्स @AUThackeray
Published on

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) दादर येथील महापौर निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यात येत आहे. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे, तर स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्याचे काम एमएमआरडीएमार्फत सुरू आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांचे भव्य स्मारक दादर येथील महापौर बंगल्याच्या जागेवर उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार स्मारक उभारण्याची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपविण्यात आली आहे. एमएमआरडीएने स्मारकाच्या ‘टप्पा १’च्या कामासाठी मे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंत्राटदाराची तसेच मे. आभा नरेन लांबा असोसिएट्स या सल्लागाराची नेमणूक केली होती. या टप्प्यात महापौर निवासस्थान इमारतीच्या सांस्कृतिक ठेव्याचे जतन करून त्याचे संग्रहालयात रुपांतरीत करण्यात आले आहे. यासह प्रवेशद्वार इमारत, प्रशासकीय इमारत आणि इंटरप्रिटेशन सेंटरचे बांधकामही पूर्ण झाले आहे.

या प्रकल्पाच्या ‘टप्पा-१’अंर्तगत एक इंटरप्रिटेशन सेंटर बांधण्यात आले आहे. याचे क्षेत्रफळ अंदाजे १५३०.४४ चौरस मीटर आहे. हे सेंटर भूमिगत स्वरूपात असून तळघरात कलाकार दालन, संग्रहालय, ग्रंथालय या दालनांचा तसेच प्रसाधनगृह आणि देखभाल कक्ष यांचा समावेश आहे. प्रवेशद्वार इमारतीचे क्षेत्रफळ अंदाजे ३०९९.८४ चौरस मीटर आहे. यामध्ये सभागृह, सुरक्षा नियंत्रण कक्ष, २७ वाहनांसाठी भूमिगत वाहनतळ आणि वाहनांसाठी दोन स्वतंत्र उद‌्वाहकांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये भविष्यकाळातील तंत्रज्ञानाचा वापर करुन, महापौर निवासस्थान इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटाचे प्रदर्शन करणारी विविध छायाचित्रे, दृष्यचित्रे आणि त्यांचा राजकीय प्रवास दर्शवणारी माहिती प्रदर्शित केली जाईल.

तसेच तंत्रज्ञानाशी संबंधित विविध सेवांचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये हार्डवेअर आणि सहाय्यभूत सेवा, लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्युअल रिॲलिटी, ऑडिओ व्हिज्युअल आणि तांत्रिक घटक यांचा समावेश असेल.

या कामासाठी मे. आभा नरेन लांबा असोसिएट्स या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून ‘टप्पा २’मधील कामाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्याचे काम सुरू आहे.

तीन एकर जागेत उद्यान

प्रशासकीय इमारत ६३९.७० चौरस मीटर क्षेत्रफळाची असून यामध्ये उपाहारगृह, कलाकार दालन कक्ष, प्रसाधनगृह आणि न्यासाचे अध्यक्ष व सचिव कार्यालये यांचा समावेश आहे. इमारतीचे छत आधुनिक मंगलौरी कौल पद्धतीने बांधण्यात आले आहे. महापौर निवासस्थान आणि इतर संबंधित इमारतींव्यतिरिक्त ३ एकर जागेत उद्यान तयार करून परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.

‘टप्पा-१‘अंतर्गत महापौर निवासाचे सौंदर्यीकरण पूर्ण

या प्रकल्पाच्या ‘टप्पा-१’च्या कामाची एकूण किंमत १८०.९९ कोटी इतकी आहे. ‘टप्पा १’अंतर्गत महापौर निवासस्थान इमारतीचे नूतनीकरण आणि सांस्कृतिक ठेव्याचे जतन करण्यात आले आहे. इमारतीचे अंतर्गत व बाह्य भागातील स्थापत्य आणि विद्युतकामे पूर्ण करून इमारतीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in