अधिवेशनाचा पहिला आठवडा विरोधी पक्षनेत्याविनाच

आठवड्यात तरी विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का, हे पहावे लागणार आहे
अधिवेशनाचा पहिला आठवडा विरोधी पक्षनेत्याविनाच

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या ऐन तोंडावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार थेट सरकारमध्ये सहभागी होऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेते झाले. त्यामुळे विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण होणार, हा नवीन प्रश्न निर्माण झाला. आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांचे नाव सुचविण्यात आले होते. मात्र, नंतर काँग्रेसने दावा केला. महाविकास आघाडीने काँग्रेसचा दावा मान्यही केला. मात्र, आता अधिवेशनाचा एक आठवडा उलटून गेला तरी अद्याप विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळालेला नाही. विरोधी पक्षनेतेपद संसदीय लोकशाहीत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. मुख्यमंत्र्यांप्रमाणेच या पदालाही एक मान असतो. सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम या पदाचे असते. मात्र, सध्या प्रचंड बहुमत असलेल्या राज्य सरकारवर अंकुश ठेवायला विरोधी पक्षनेताच नाही. हे पद संवैधानिकदृष्ट्या अत्यावश्यक नसल्याने ते रिक्त राहिले तरी सदनाच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत नसतो.

अजित पवार यांनी सरकारची वाट धरली आणि विरोधी पक्षनेता कोण, हा प्रश्न निर्माण झाला. आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव सुचविणारे पत्र दिले होते, मात्र आव्हाड यांच्या निवडीसमोर तांत्रिक अडचणी आहेत. मुळात अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, शरद पवार यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे, याचा नेमका आकडा समोर आलेला नाही. तसेच दोन्ही गटांनी परस्परविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची पत्रे दिली आहेत. त्यामुळे या सर्वांवरच प्रश्नचिन्ह असल्याने आव्हाड यांचे नाव बारगळले. त्यातच काँग्रेसने आमचा पक्ष आता मोठा असल्याचे सांगत विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना ठाकरे गटाने देखील काँग्रेसचा हा दावा मान्य केला आहे.

मात्र आता काँग्रेसच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे निवडीबाबत घोळ सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे दोन माजी मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा असल्याने नाना पटोले, महिला आणि आक्रमक आमदार यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार आणि विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. अर्थातच अंतिम शिक्कामोर्तब काँग्रेस हायकमांडकडूनच होणार आहे, मात्र त्याला नेहमीप्रमाणेच वेळ काढण्यात येत आहे. अधिवेशनाचा आता एक आठवडा उलटून गेला आहे. सरकारला विरोधी पक्ष सळो की पळो करणार अशी चर्चा होती, मात्र विरोधी पक्षाचे अस्तित्वच पहिल्या आठवड्यात दिसले नाही. अधिवेशन सुरू होण्याआधी चहापानाच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष हा अवसान गळालेला, आत्मविश्वास नसलेला असल्याचा टोला लगावला होता. तो खरा होताना दिसत आहे. सध्या सरकारकडे २१० आमदारांपेक्षा जास्त संख्याबळाचा आकडा आहे. सरकारकडे बहुमताची ताकद आहे, पण सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम विरोधी पक्षाचे असते. पण सदनात नेतृत्वच नसल्याने विरोधी पक्ष गोंधळलेला आहे.

कोणाला निवडायचे? काँग्रेसपुढे प्रश्न

काँग्रेससमोर नेमके कोणते नाव निवडावे, हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण गेल्या काही वर्षांत पाहिले असता एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे-पाटील, अजित पवार हे विरोधी पक्षनेते नंतर सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर निवड करताना ती व्यक्ती नंतर भाजपसोबत जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आव्हान काँग्रेससमोर असणार आहे. त्या पदावर निवड करण्याचा अंतिम अधिकार हा विधानसभाध्यक्षांचा असतो. त्यामुळे आता या आठवड्यात तरी विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का, हे पहावे लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in