मुंबईत २५ मेपासून मासेमारी बंद; चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोळीबांधवांचा निर्णय

राज्यात अवकाळी पावसाचा फटका जसा शेतकऱ्यांना बसत आहे तसाच फटका मुंबईच्या समुद्र किनारपट्टीलाही बसत आहे. मुंबई तसेच राज्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे शेतकरी, व्यापारीसंह याचा फटका मच्छिमारी व्यवसायाला बसत आहे. ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुंबईत २५ मेपासून मासेमारी बंद; चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोळीबांधवांचा निर्णय
Published on

पूनम पोळ / मुंबई

मुंबई तसेच आसपासच्या समुद्रात चक्रीवादळ घोंघावण्याची दाट शक्यता असल्यामुळे २५ मेपासूनच एकूण १८ हजार मच्छिमार बांधवांनी बोटी समुद्रात न नेण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी मासळी बाजारात मासे महाग मिळणार आहे. तर काही दिवस आधीच मासेमारी बंद केल्यामुळे मच्छिमार बांधवांचे आर्थिक नुकसान होणार आहे, अशी माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी दिली.

राज्यात अवकाळी पावसाचा फटका जसा शेतकऱ्यांना बसत आहे तसाच फटका मुंबईच्या समुद्र किनारपट्टीलाही बसत आहे. मुंबई तसेच राज्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे शेतकरी, व्यापारीसंह याचा फटका मच्छिमारी व्यवसायाला बसत आहे. ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरवर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत समुद्रातील मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेला वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होण्यासाठी राज्य शासनाच्या नियमानुसार मासेमारी बंद ठेवण्यात येते. परंतु यंदाच्या वर्षी अवकाळी पावसामुळे समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या कालावधीत मच्छिमारांच्या जीवावर बेतू शकते.

यासाठी मुंबईतील एकूण १८ हजार कोळी बांधव वेसावे, मढ, भाटी, मालवणी, मानोरी, गोराई, जुहू, खारदांडा, वरळी, माहूल, माहीम, कुलाबा आदी ठिकाणी २५ मे पासून बोटी किनाऱ्यावर नांगरायला सुरुवात करणार आहेत. परिणामी मुंबईत मासेमारी दोन महिन्याहून अधिक काळ बंद राहणार आहे. त्यामुळे मत्स्यप्रेमी खवय्यांना ताजे मासे खायला मिळणे दुरापास्त होणार आहे.

अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे देवेंद्र तांडेल यांनी सांगितले की, दोन महिने मासेमारी बंद असल्याने व्यवसाय बंद राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांचे आर्थिक नुकसान होणार आहे. या दोन महिन्याच्या हिशोबाप्रमाणे मासेमारी व्यवसायात मच्छिमार बांधव संपूर्ण वर्षाचा आर्थिक निकष लाऊन मासेमारी करत असतात. दुर्दैवाने अधिकच्या मासेमारीमुळे आणि प्रकल्पामुळे मासे कमी होऊ लागल्याने उत्पन्न कमी होत आहे. मासेमारी व्यवसायाला दिलेल्या शेतकरी दर्जाप्रमाणे शेतजमीन विकत घेण्यासाठीसुद्धा द्यावा. जेणेकरून पावसाळ्यात मच्छिमार शेती करून उदरनिर्वाह करू शकेल, अशी आमची मागणी आहे. जोडधंद्याची निर्मिती होणे ही काळाची गरज आहे, असेही तांडेल म्हणाले.

दोन महिने मच्छिमारी बंद असल्याने आम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. यंदा चक्रीवादळाची शक्यता निर्माण झाल्याने लवकरच बोटी बंद करण्यात येणार आहे. बाजारात जतन करून ठेवलेले मासे खरेदी करण्यात मत्स्यप्रेमी उत्साह दाखवत नाहीत. वेळप्रसंगी ते मासे कमी दरात विकावे लागतात किंवा फेकावे लागतात. - हर्षाली कोळी, मच्छीविक्रेता
logo
marathi.freepressjournal.in