मुंबई : ड्रग्ज तस्करीच्या तीन गुन्ह्यांत पाच आरोपींना गुन्हे शाखेसह ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी एक कोटी पाच लाख रुपयांचा चरस, हेरॉईन आणि एमडीएमए टॅबलेटचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर या पाचही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर परिसरात काहीजण ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलिसांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून दोन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांचे नाव नदीम मोहम्मद इंद्रीस शहा आणि अक्षय लक्ष्मण वाघमारे असल्याचे उघडकीस आले. ते दोघेही रायगडच्या उरण, कातकरीवाड्याचे रहिवाशी आहेत. त्यांच्या अंगझडती पोलिसांना साडेसहा किलो चरसचा साठा सापडला असून, त्याची किंमत सुमारे तीस लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसऱ्या कारवाईत कांदिवली युनिटच्या अधिकाऱ्यांनी ३८ आणि २९ वर्षांच्या नदीम एजाज अली व हौसेब अमीन गौस या दोन तरुणांना अटक केली. दोन्ही आरोपी उत्तरराखंडचे रहिवाशी असून, त्यांच्याकडून पोलिसांनी १५० ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे हेरॉईन जप्त केले आहेत.