साडेपाच लाख किलो निर्माल्य जमा; उपनगरातून सर्वाधिक निर्माल्य संकलन

पालिकेच्या प्रशासकीय विभागांमध्ये असणाऱ्या सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये हलविण्यात आले आहे.
साडेपाच लाख किलो निर्माल्य जमा; उपनगरातून सर्वाधिक निर्माल्य संकलन

लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या गणरायाला शुक्रवार अनंत चतुर्दशीच्या दिवशी भावपूर्ण निरोप देण्यात आला. १० दिवसांच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी वाहिलेली पाने, फुले, दूर्वा इत्यादी निर्माल्य गोळा केले आहे. तब्बल पाच लाख ४९ हजार ५१५ किलो निर्माल्य संकलन केले असून, निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक भांडुप (एस विभाग), अंधेरी पश्चिम (के पश्चिम) व बोरिवली पश्चिम (आर मध्य) या विभागांत निर्माल्य संकलन झाले आहे. या निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येणार असून, पालिकेच्या उद्यानात खत वापरणार आहे. खतनिर्मितीची कार्यवाही महानगरपालिका आयुक्त डॉ. इ.सिं. चहल व अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार घन कचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे, अशी माहिती उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) डॉ. संगीता हसनाळे यांनी दिली आहे.

गणपती बाप्पाला यंदाच्या गणेशोत्सवामध्ये अर्पण करण्यात आलेले सुमारे पाच लाख ४९ हजार ५१५ इतक्या मोठ्या प्रमाणातील निर्माल्य हे पालिकेच्या प्रशासकीय विभागांमध्ये असणाऱ्या सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये हलविण्यात आले आहे. तसेच आता ह्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेस सुरुवातही झाली आहे. पुढील साधारणपणे एका महिन्याच्या कालावधीत ह्या सर्व निर्माल्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यामार्फत देण्यात आली आहे. तर तयार होणारे हे सेंद्रिय खत महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये असलेल्या झाडांना खत म्हणून वापरण्यात येणार आहे.

सहा हजारांपेक्षा अिधक मनुष्यबळ

गणेशोत्सव कालावधीत विसर्जनस्थळी व लगतच्या परिसराची साफसफाई करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अशासकीय संस्थांकडून कामगारांची व्यवस्था दैनिक स्वरूपात करण्यात आली होती. या साफसफाई संबंधित कामांकरिता साधारणपणे सहा हजारपेक्षा अधिक मनुष्यबळ अव्याहतपणे कार्यरत होते. तसेच विसर्जनस्थळी व लगतच्या परिसरात जमा होणारा कचरा वाहून नेण्यासाठी अतिरिक्त वाहनांच्या सेवाही (डम्पर्स) पुरविण्यात आल्या होत्या, अशीही माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in