Torres Scam : फसव्या टोरेस कंपनीची पाच बँक खाती गोठवली; ५२ जणांकडून तक्रार दाखल

भाईंदरमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडणाऱ्या टोरेस कंपनीविरोधात नवघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा दाखल करण्यात आला आहे.
Torres Scam : फसव्या टोरेस कंपनीची पाच बँक खाती गोठवली; ५२ जणांकडून तक्रार दाखल
एफपीजे/विजय गोहिल
Published on

भाईंदर : भाईंदरमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडणाऱ्या टोरेस कंपनीविरोधात नवघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ५२ जणांनी तक्रार अर्ज पोलिसांकडे आले असून दोन दिवसात पोलिसांनी फसव्या टोरेस कंपनीचे वेगवेगळ्या बँकेत असलेले बँक खात्यातील एकूण ८ कोटी ७७ लाख रुपये जमा असलेली बँक खाती गोठवली असल्याची माहिती मिळत आहे. नवघर पोलीस पाहिजे आरोपींचा शोध घेत आहेत. टोरेस नावाच्या ज्वेलरी शॉपमध्ये अन्य नागरिकांनी गुंतवणूक केली असल्यास नवघर पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन नवघर पोलिसांच्यावतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

नवघर पोलीस ठाण्याचे हद्दीत अनंता एक्झोरिया बिल्डिंग रामदेव पार्क येथे टोरेस नावाचे ज्वेलरीचे दुकान भाड्याने घेवून भाईदर, मीरारोड, नयानगर, काशिमीरा व इतर परिसरातील नागरिकांना विविध प्रकारच्या गुंतवणुकीच्या योजना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने नागरिकांना प्रोत्साहीत करून मोजोनाईट स्टोन खरेदी केल्यास ९ टक्के बोनस व चांदीचे दागिने खरेदी केल्यास ४ टक्के, सोन्याचे दागिने खरेदी केल्यास २ टक्के गुंतवणुकीवर दर आठवड्याला बोनस म्हणून परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यानंतर अचानक दुकान बंद झाल्याने गुंतवणूकदार यांची फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्याने नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

त्यानंतर तात्काळ पोलिसांनी कंपनीच्या विविध बँक खात्यांची तपासणी केली असता, एका खात्यात १ कोटी ७७ लाख रुपये तर दुसऱ्या खात्यात ७ कोटी असल्याचे आढळून आले होते. ही रक्कम कंपनीकडून इतरत्र वळवली जाऊ नये किंवा ती काढून घेतली जाऊ नये, म्हणून पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याची माहिती बँकांना देत दोन्ही खाती गोठवली आहेत. सदरील गुन्ह्याचा तपास मीरा-भाईंदर परिमंडळ -१ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्तविवेक मुगळीकर, नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप व्हसकोटी हे करत आहेत.

दुसऱ्या दिवशी १७ जणांची तक्रार

सदर गुन्ह्यात पहिल्या दिवशी ३० ते ३५ जणांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, मात्र दुसऱ्या दिवशी जवळपास १७ जणांनी तक्रार अर्ज दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या फिर्यादी व साक्षीदार यांची एकूण ६८ लाख ११ हजार ७३३ रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी दिली आहे.

टोरेस गुंतवणूक : नवीन पाँझी स्कीम

काय आहे टोरेस?

ब्रँड - टोरेस ज्वेलरी

कंपनी - प्लॅटिनम हरेन प्रायव्हेड लिमिटेड

व्यवसाय - दागिने विक्री व गुंतवणूक

कोण जबाबदार?

मुख्याधिकारी - तौसिफ रियाझ

सीए - अभिषेक गुप्ता

सर्वेश सुर्वे - कंपनी संचालक (भारतीय), तान्या कासाटोवा - दालन व्यवस्थापक (उझबेकिस्तान), व्हॅलेंटिना गणेश कुमार - व्यवसाय विक्री विभाग प्रमुख (रशिया)

जाॅन कार्टर व व्हिक्टोरिया कोवालेन्को (युक्रेन)

गुंतवणूकदार आणि गुंतवणूक किती?

गुंतवणूकदार - १.२५ लाख

गुंतवणूक - १,००० कोटी रुपये

स्थापना - २४ फेब्रुवारी २०२४

दालने - ग्रँट रोड, दादर, कांदिवली, सानपाडा, कल्याण, मीरा रोड

आमिष - आठवड्याला ६ ते १३ टक्के परतावा

(म्हणजेच वर्षाला ३१२ ते ६७६ टक्के)

गुंतवणूक - मोईसानाईट स्टोन

योजना - सोने, सोन्याच्या दागिने खरेदीवर वार्षिक ४८ टक्के परतावा.

चांदीच्या धातू, आभूषणांमधील गुंतवणुकीवर वार्षिक ९६ टक्के परतावा.

मोइसॅनाइट (हिरे सदृश्य रत्न) खरेदीवर वार्षिक ५२० टक्के परतावा

फेब्रुवारी २०२४ पासून कंपनी, दालने अस्तित्वात

जून २०२४ मध्ये गुंतवणूक योजना सुरू

नोव्हेंबर २०२४ पर्यंत नियमित परतावा अदा

३० डिसेंबर २०२४ ला दालन बंद

जानेवारी २०२५ गुंतवणूकदार आक्रमक

लाभार्थी कसे?

टोरेस ज्वेलरीने २०२४ मध्ये वर्षअखेरिस जाहीर करण्यात आलेले बक्षीस विजेते

आयफोन १५ प्रो मॅक्स - स्वाती तबडकर

सोन्याचे दागिने - शीतल जाधव

चांदीचे दागिने - एम. विजयलक्ष्मी

तक्रार आणि कारवाई

कंपनीचे संचालक, मुख्याधिकारी विरोधात ६१ गुंतवणूकदारांनी १३.४८ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराबाबत केलेल्या तक्रारीनंतर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण आता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. अधिक रकमेच्या आर्थिक गैरव्यवहारांचा तपास या यंत्रणेमार्फत केला जातो. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण अन्य तपास यंत्रणेकडे सुपूर्द केले आहे. तसेच कंपनीची तीन बँक खाती जप्त करून दादर येथील दालनातील २८ लाखाची रोकड जप्त केली आहे.

मोइसॅनाइट काय आहे?

मोइसॅनाइट हे सिलिकॉन कार्बाइडपासून बनवलेले रत्न आहे. ते चकाकीसाठी तसेच आगीपासून संरक्षित व टिकाऊपणासाठी प्रसिद्ध आहे. सारख्याच हिऱ्याप्रमाणे असलेले स्वरूप आणि तुलनेत कमी किमतीमुळे दागिन्यांमध्ये पर्याय म्हणून या रत्नाचा वापर केला जातो. ते अनेकदा रंगहीन असतात किंवा फिकट पिवळ्या तसेच राखाडी रंगाचेही असतात. ते सर्वात कठीण रत्नांपैकी एक आहे. अंगठी, इअररिंग, नेकलेस आणि इतर लहान दागिन्यांमध्ये ते वापरले जाते.

कंपनीने गुंतवणूक स्वीकारण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक किंवा अन्य कोणत्याही सरकारी नियामक यंत्रणेची परवानगी घेतली नव्हती. कंपनीने सुनियोजित आणि संघटित पद्धतीने आर्थिक गुन्हा केला आहे.

- युवराज सरनोबत , पोलीस निरिक्षक

मी एक लाख रुपये गुंतवले होते. ५२ आठवड्यांत वार्षिक १० ते ११ टक्के परतावा मिळेल, असे कंपनीने आम्हाला सांगितले. गुंतवणुकीतील अधिक परताव्याच्या आश्वासनामुळे मी पैसे गुंतवले होते. आणि आता मला कळले की दुकान बंद आहे आणि कंपनीचे कर्मचारीही फोन उचलत नाहीत. आम्हाला आमची मुद्दल मिळाली तरी खूप झाले.

- मुर्तझा जरोरा, गुंतवणूकदार

logo
marathi.freepressjournal.in