
तीन आठवड्यांत दुप्पट रक्कम करण्याच्या आमिषाने एका ७० वर्षांच्या वयोवृद्धाची ४५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या एका महिलेसह पाच जणांना दहिसर पोलिसांनी अटक केली. गोपाळ नारायण पाटील, प्रिया सोनी, गणेश पवार, कैलासबाबा आणि दीपक कोठेकर अशी या पाच जणांची नावे आहेत. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत पाच जण सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
यातील तक्रारदार ७० वर्षांचे वयोवृद्ध असून त्यांना मुंबईत एक घर घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी एका महिलेला सांगितले होते. या महिलेने त्यांची एका इस्टेट एजंटशी ओळख करून दिली होती. याच दरम्यान ते त्याच्यासोबत घरासाठी पनवेल येथे गेले होते; मात्र त्यांना पनवेलऐवजी दादर आणि माटुंगा येथे घर घ्यायचे होते. यावेळी या महिलेने त्यांना सातारा येथे दुप्पट रकमेचा डेमो करणार आहे. त्यांना फ्लॅटसाठी काही रक्कम कमी पडत असल्याने त्यातून त्यांना चांगला फायदा होईल, असे सांगितले.