मालवणी परिसरात राडा करणाऱ्या पाच जणांना अटक

शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मालवणी परिसरात राडा करणाऱ्या पाच जणांना अटक

मुंबई : मालाडच्या मालवणी परिसरात रविवारी रात्री राडा घालणाऱ्या पाच जणांना मालवणी पोलिसांनी अटक केली. या जमावाने पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. सूरज गणेश प्रसाद, यास्मिन सुरज प्रसाद, राज योगेश कशाळकर, योगेश जयवंत कशाळकर आणि योजना योगेश कशाळकर अशी या पाचजणांची नावे आहेत.

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलांचा समावेश असलेल्या दोन गटात हाणामारी असल्याचे समजताच, पोलिसांनी धाव घेतली. यावेळी एका महिलेने सहाय्यक उपनिरीक्षकाच्या हातावर जोरदार प्रहार केला. तर पोलीस शिपाई मोरे यांना इतरांनी मारहाण केली, त्यात ते दोघेही किरकोळ जखमी झाले होते. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, इतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर पोलिसांनी पाच आरोपींना अटक करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्याविरुद्ध दंगल घडवून मारहाण करणे, शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in