पुण्यात राज्यपालांच्या, तर कोल्हापुरात अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ध्वजारोहण करतील
पुण्यात राज्यपालांच्या, तर कोल्हापुरात अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पालक मंत्रिपदाचा तिढा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्वातंत्र्यदिनी कोणत्या जिल्ह्यात कोणत्या मंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होईल, याची यादी शुक्रवारी प्रकाशित केली. विशेष म्हणजे सरकारने गुरुवारच्या यादीत बदल केला असून, पुणे जिल्ह्यातील ध्वजारोहण आता पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ऐवजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते होईल, असे स्पष्ट केले आहे. तर चंद्रकांत पाटील हे पुण्याऐवजी रायगड जिल्ह्यात ध्वजारोहण करतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापूर येथे ध्वजारोहण होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथे ध्वजारोहण करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण ध्वजारोहण करतील.

प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन या राष्ट्रीय सणाच्या दिवशी संबंधित जिल्ह्यात पालक मंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतो हीच आजवरची परंपरा आहे, मात्र सध्या राज्यात वेगळी राजकीय परिस्थिती आहे. राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह २९ मंत्री आहेत. यापैकी मंत्रिमंडळात नव्याने सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालक मंत्रिपद नाही. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी एक परिपत्रक जारी केले. या परिपत्रकात १५ ऑगस्ट रोजी कोणत्या मंत्र्यांच्या हस्ते कोणत्या जिल्ह्यात ध्वजारोहण होईल हे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, पुणे आणि रायगड जिल्ह्यातील वाद लक्षात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी सुधारित परिपत्रक काढले.

या परिपत्रकानुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यात, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ अमरावतीमध्ये, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुण्यात, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील वाशिममध्ये, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील अहमदनगर जिल्ह्यात, तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये ध्वजारोहण करतील. विशेष म्हणजे दादा भुसे नाशिकचे पालक मंत्री असताना महाजन यांना ध्वजारोहणाची संधी देण्यात आली आहे, तर दादा भुसे धुळे जिल्ह्यात ध्वजारोहण करतील.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील जळगावमध्ये, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सोलापूर जिल्ह्यात, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ध्वजारोहण करतील. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे परभणीत, नंदकुमार गावित नंदुरबारमध्ये, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई सातारा जिल्ह्यात, अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तर जालना येथे, तर कृषी मंत्री धनंजय मुंडे बीड जिल्ह्यात ध्वजारोहण करतील. पालघरमध्ये महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, मुंबई उपनगरात मंगलप्रभात लोढा, लातूर जिल्ह्यात बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे, तर मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते बुलढाणा जिल्ह्यात ध्वजारोहण होईल. दरम्यान, हिंगोली, वर्धा, गोंदिया, नांदेड, भंडारा आणि अकोला या जिल्ह्यात संबंधित जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

logo
marathi.freepressjournal.in