भांडुपमध्ये फ्लेमिंगो पार्क; पम्पिंग स्टेशन येथील पर्यटनस्थळाचा मार्ग मोकळा, केंद्र सरकारची मंजुरी

पूर्व उपनगरातील भांडुप येथे वर्षभरात फ्लेमिंगो पार्क होणार आहे. तसेच भांडुप पंपिंग स्टेशन परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला असून याला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.
भांडुपमध्ये फ्लेमिंगो पार्क; पम्पिंग स्टेशन येथील पर्यटनस्थळाचा मार्ग मोकळा, केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई : पूर्व उपनगरातील भांडुप येथे वर्षभरात फ्लेमिंगो पार्क होणार आहे. तसेच भांडुप पंपिंग स्टेशन परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला असून याला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पूर्व उपनगरात पहिले फ्लेमिंगो पार्क साकारणार आहे.

ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते बुधवारी भूमिपूजन पार पडले. शिवडी खाडीत दरवर्षी येणारे फ्लेमिंगो पक्षी पर्यटकांचे आकर्षण ठरतात. तर फ्लेमिंगोसह अनेक विदेशी पक्षी थंडीच्या मोसमात हजारो किमीचा प्रवास करून भांडुप पंपिंग स्टेशन येथील खाडी भागात स्थलांतर करतात.

या पक्ष्यांना पाहण्यासाठी पक्षी निरिक्षकांसह पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मात्र या पर्यटकांच्या सुरक्षेची कुठलीही ठोस तरतूद वा सोयीसुविधा याठिकाणी उपलब्ध नव्हत्या. ही बाब खासदार मनोज कोटक सन २०१९ मध्ये संसदेत मांडली होती. तसेच याठिकाणी फ्लेमिंगो पार्क तथा पक्षी निरिक्षण उद्यान व पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याची मागणी केली होती. अखेर केंद्र सरकारने दखल घेत आवश्यक त्या सर्व परवानग्या दिल्या असून लवकरच वन विभागातर्फे येथे एक सुसज्ज फ्लेमिंगो पार्क उभे राहणार आहे. पक्षीप्रेमींसह पर्यटकांसाठी ही एक पर्वणी असणार आहे. या कामाचा पहिला टप्पा म्हणून फ्लेमिंगो पार्कसाठी फ्लोटींग जेट्टी लिंक स्पॅन व जोडरस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांतर्गत पर्यकांसाठी फेरी बोटसेवा, फ्लोटींग जेट्टी, सौरदिवे, उद्यानासाठी बाके, जेट्टीकडे जाणारे रस्ता आदी कामांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in