फ्लोटिंग होर्डिंग्जच्या प्रकाशप्रदूषणाचा फ्लेमिंगोंना धोका; तरंगत्या जाहिरात फलकामुळे सागरी जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती

मुंबई आणि महानगर प्रदेशातील किनारपट्टीवर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित तरंगत्या जाहिरात फलकांमुळे (फ्लोटिंग होर्डिंग्ज) स्थलांतरित फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
फ्लोटिंग होर्डिंग्जच्या प्रकाशप्रदूषणाचा फ्लेमिंगोंना धोका; तरंगत्या जाहिरात फलकामुळे सागरी जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती
फ्लोटिंग होर्डिंग्जच्या प्रकाशप्रदूषणाचा फ्लेमिंगोंना धोका; तरंगत्या जाहिरात फलकामुळे सागरी जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती
Published on: 

उरण : मुंबई आणि महानगर प्रदेशातील किनारपट्टीवर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित तरंगत्या जाहिरात फलकांमुळे (फ्लोटिंग होर्डिंग्ज) स्थलांतरित फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या या प्रस्तावामुळे समुद्रात कृत्रिम प्रकाशप्रदूषण वाढून पक्ष्यांच्या दिशाभानावर तसेच सागरी जैवविविधतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा नॅटकनेक्ट फाऊंडेशनने दिला आहे. या प्रस्तावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही फाऊंडेशनने केली आहे.

मुंबई आणि महानगर प्रदेशातील महत्त्वाच्या किनारपट्टीच्या ठिकाणी जाहिरातींसाठी तरंगत्या बार्जेसवर डिजिटल आणि प्रकाशमान फलक उभारण्याचा प्रस्ताव मेरीटाइम बोर्डाने मांडला आहे. मात्र, या फलकांमधून निर्माण होणारा तीव्र कृत्रिम प्रकाश स्थलांतरित पक्ष्यांसाठी धोकादायक ठरू शकतो. दरवर्षी हिवाळ्यात मुंबईत येणाऱ्या फ्लेमिंगोंची पारंपरिक खाद्य आणि विश्रांतीची ठिकाणे आधीच असुरक्षित होत असताना अशा जाहिरात फलकांमुळे त्यांच्या अधिवासावर आणखी संकट येण्याची शक्यता आहे.

नॅटकनेक्टचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले की, तीव्र प्रकाशामुळे उडणाऱ्या पक्ष्यांची दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे ते जाहिरात फलक किंवा अन्य संरचनांवर आदळून जखमी होण्याचा अथवा मृत्यू होण्याचा धोका आहे. फ्लेमिंगोंचे स्वागत निसर्गरम्य किनाऱ्याऐवजी जाहिरातींच्या झगमगाटात करायचे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

एप्रिल २०२४ मध्ये नेरूळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तलाव परिसरात अनेक फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला होता. या घटनेची राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) स्वतःहून दखल घेतली होती. पक्ष्यांच्या उड्डाणमार्गातील एलईडी दिव्यांमुळे दिशाभूल होऊन अपघात झाल्याची शक्यता त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती. या घटनेतून धडा घेण्याची गरज असल्याचे कुमार यांनी नमूद केले. नॅटकनेक्टने या प्रस्तावाचा स्वतंत्र पर्यावरणीय अभ्यास झाला आहे का, प्रकाशाची तीव्रता, रंगछटा आणि कालावधी यांचा विचार करण्यात आला आहे का, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. सागरी शास्त्रज्ञ आणि वन्यजीव तज्ज्ञांचा सल्ला तसेच आवश्यक वैधानिक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का? याचीही स्पष्टता मागितली आहे.

महसुलापेक्षा पर्यावरण महत्त्वाचे

व्यावसायिक जाहिरातींतून महसूल मिळविण्यापेक्षा किनारपट्टीचे पर्यावरण आणि जैवविविधता जपणे महत्त्वाचे आहे. समुद्र हा जाहिरातींसाठी मोकळा व्यासपीठ नसून अंधार हा निसर्गाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय हा प्रस्ताव पुढे नेऊ नये, अशी भूमिका नॅटकनेक्टने मांडली आहे.

निळसर प्रकाशाचे तीव्र एलईडी दिवे प्लँक्टनच्या नैसर्गिक हालचालींवर परिणाम करू शकतात. तसेच माशांच्या खाद्य शोधण्याच्या पद्धती आणि किनारी अन्नसाखळी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तरंगत्या बार्जेसमुळे वाढणारी नौकांची वर्दळ आणि जनरेटरचा आवाजही सागरी जिवांसाठी त्रासदायक ठरू शकतो.
ज्योती नाडकर्णी, संचालिका स्वर्णश्री हॅबिटॅट रिस्टोरर फाऊंडेशन