प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा ;अन्यथा कठोर कारवाईचा इशारा

मुंबईतील प्रदूषणावर नियंत्रणासाठी पालिकेने तातडीने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.
प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा ;अन्यथा कठोर कारवाईचा इशारा

मुंबई : हिवाळ्यात हवेची गुणवत्ता खालावते आणि प्रदूषणाचा धोका वाढतो. प्रदूषणात वाढ झाल्याने मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका लक्षात घेता मुंबई महापालिकेने नव्याने मार्गदर्शक तत्वे बुधवारी जाहीर केली. यात आठ वर्षे जुन्या डिझेल वाहनांना बंदी, बांधकाम व्यवसायिक, विकासकांनी वाहनांत ट्रॅकिंग सिस्टम बसवलेली अशाच वाहनांचा कामांसाठी वापर करावा, अशा प्रकारच्या नवीन नियमावली जारी केली आहे. नवीन नियमावलीचे पालन न केल्यास अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर सक्त कारवाई केली जाईल असे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सांगितले. कारवाईसाठी विभागवार पथकेही नियुक्ती करण्यात येणार असल्याचे चहल यांनी सांगितले.

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. यावर उपाययोजनांसाठी पालिकेने तात्काळ पावले उचलली आहेत. मुंबईत मोठ्या प्रमाणात इमारतींचे काम सुरु असून धुळीचे प्रमाण वाढले आहे. धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. धूळ व प्रदूषण वाढवणा-या संबंधितांनी यावर तात्काळ उपाय़योजनांची अंमलबजावणी करावी असे निर्देश पालिकेने दिले आहेत. त्यासाठी पालिकेने मार्गदर्शक तत्वे तयार केली असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. याच्य़ा अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केल्य़ास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पालिका आयुक्तांनी दिला आहे.

विभाग स्तरावर पथके नेमणार -

मुंबईतील प्रदूषणावर नियंत्रणासाठी पालिकेने तातडीने उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. यासाठी विभागवार पथके नियुक्त करून त्वरीत अंमलबजावणी करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. या पथकात लहान विभागासाठी प्रत्येक विभागात दोन पथके, मध्यम विभागात चार पथके तसेच मोठ्या विभागासाठी सहा पथके नियुक्त केली जाणार आहेत. अंमलबजावणी पथकांनी संबंधित परिसराला भेट देऊन कामाच्या ठिकाणाची व्हिडिओग्राफी करावी. कामाच्या ठिकाणी तरतुदींचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास, काम थांबवण्याची नोटीस जारी करणे आणि/किंवा कामाचे ठिकाण सील करणे, यासारखी कठोर कारवाई तत्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

काय आहेत मार्गदर्शक तत्वे -

- साहित्य वाहून नेणारी वाहने पालन करत नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर जप्तीची कारवाई करावी.

- आठ वर्षांहून अधिक जुन्या अवजड डिझेल वाहनांना मुंबई कार्यक्षेत्रात वाहतूक करण्यास सक्त मनाई असेल.

- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढील महिनाभराच्या कालावधीत दररोज बीपीसीएल, एचपीसीएल, आरसीएफ, टाटा पॉवर तसेच जवळपासच्या औद्योगिक वसाहत क्षेत्रातील उद्योग ठिकाणांहून उत्सर्जित होणाऱ्या वायू प्रदूषणाचे दैनंदिन स्वरूपात एक महिन्यापर्यंत निरीक्षण करून योग्य ती कारवाई करावी.

- सर्व बांधकाम व्यवसायिक/विकासकांनी ज्यांच्यामध्ये ट्रॅकिंग सिस्टम बसवलेली आहे अशाच वाहनांचा कामांसाठी वापर करावा.

- सार्वजनिक रस्ते, पदपथ, पदमार्गिका आणि मोकळ्या जागेवर बांधकाम साहित्य आणि राडारोडा टाकला जाणार नाही, याची खात्री करावी.

- पालिकेच्या कार्यक्षेत्रातील भौगोलिक क्षेत्रामध्ये विशेषतः क्षेपणभूमी (डम्पिंग ग्राऊंड) आणि कचरा जाळण्याच्या संभाव्य ठिकाणी कुठेही उघड्यावर कचरा जाळण्यावर पूर्णपणे बंदी असेल.

logo
marathi.freepressjournal.in