त्रिसूत्रीचे पालन करा अन्यथा कठोर पावले उचलावी लागतील

 त्रिसूत्रीचे पालन करा अन्यथा कठोर पावले उचलावी लागतील
Published on

कोरोनाच्या चौथ्या लाटेवर मात करण्यासाठी मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझेशन वेळोवेळी करणे, या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी दैनिक ‘नवशक्ति’च्या माध्यमातून लोकांना केले आहे. दरम्यान, नियमांचे पालन केले नाही, तर मात्र पुन्हा एकदा राज्य सरकारला कठोर पावले उचलावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा प्रसार झपाट्याने होत असला तरी रुग्णवाढीचा वेग कमी आहे. कोरोनाच्या तिन्ही लाटा परतवण्यात लोकांनी सहकार्य केले, त्याप्रमाणे पुन्हा एकदा सहकार्य करावे. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे गरजेचे असून सार्वजनिक ठिकाणी ही मास्कचा वापर केल्यास आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घेणे शक्य होईल, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

कोरोनाच्या चौथ्या लाटेत रुग्णसंख्येवर लक्ष असून प्रत्येकाने खबरदारी घ्यावी; अन्यथा निर्बंध लावणे सरकारला भाग पडेल. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, जेणेकरून राज्य सरकारला निर्बंध लावण्याची गरज पडणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

‘या’ गोष्टी करा!

रुग्णालये, चित्रपटगृहे, बंदिस्त सभागृहे, मॉल्स व गर्दीच्या ठिकाणी मास्क लावावा.

९९ अंश ताप असलेल्या रुग्णांची काळजी घ्या!

बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करा.

logo
marathi.freepressjournal.in