राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेतही आघाडीला भाजपाचा धक्का

भाजपाच्या प्रसाद लाड यांचा विजय,काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा धक्कादायक पराभव काँग्रेसची तीन मते फुटली
राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषदेतही आघाडीला भाजपाचा धक्का

विधानपरिषदेच्या निवडणुकीतही भाजपाने महाविकास आघाडीला अस्मान दाखविले आहे.आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिंकत असताना काँग्रेसच्या चंद्रकातं हंडोरे यांना मात्र पराभवाचा फटका बसला आहे.भाजपाच्या प्रसाद लाड यांनी चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला आहे.भाजपाचे पाचही उमेदवार जिंकले आहेत.शिवसेनेचे सचिन अहिर,आमश्या पाडवी.राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर,एकनाथ खडसे तर काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले आहेत.भाजपाचे प्रवीण दरेकर,राम शिंदे,श्रीकांत भारतीय,उमा खापरे आणि प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे.काँग्रेसच्या दोन पैकी एकाही उमेदवाराला पहिल्या फेरीत यश मिळविणे शक्य झाले नाही.हंडोरे आणि जगताप यांना मिळालेली मते पाहता काँग्रेसची तीन मते तरी फुटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.तर राज्यसभा निवडणुकीत १२३ मते मिळविणा-या भाजपाने यावेळी १३४ मते मिळविल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवाने महाविकास आघाडीला राज्यसभेनंतर विधानपरिषदेतही जोरदार असा धक्का बसला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीतही मास्टरस्ट्रोक लावत आपले पाचही उमेदवार निवडून आणले असून आघाडीला विशेषत काँग्रेसला धक्का दिला आहे.

विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १० जागांसाठी आज मतदान झाले. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार चुरस होती.राज्यसभेप्रमाणे आज विधान परिषदेसाठीही २८५ आमदारांनी मतदान केले. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे विधानसभेतील एक जागा रिक्त आहे. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाने मतदानासाठी परवानगी दिली नाही. त्यामुळे मतदानाची वेळ संपली तेव्हा २८५ आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी सहायकाच्या मदतीने मतदान करून गोपनीयतेचा भंग केल्याचा आक्षेप कॉंग्रेसने घेतल्याने निवडणुकीची मतमोजणी रेंगाळली. राज्य निवडणूक आयोगाने कॉंग्रेसचा आक्षेप फेटाळून लावल्यानंतर कॉंग्रेसने भारत निवडणूक आयोगाकडे दाद मागितली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतमोजणीसाठी आयोगाच्या आदेशाची वाट पहावी लागली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपाच्या उमा खापरे यांच्या प्रत्येकी एका मताला आक्षेप घेण्यात आला.त्यामुळे ही दोन मते बाद करण्यात आली.यामुळे एकूण २८५ पैकी २८३ मते मोजणीसाठी घेण्यात आली.मतमोजणी तब्बल दोन तास रेंगाळल्यानंतर सुरू झाली.

शिवसेनेचे सचिन अहिर,आमश्या पाडवी,राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे नाईक निंबाळकर,एकनाथ खडसे,भाजपाचे प्रवीण दरेकर,राम शिंदे,श्रीकांत भारतीय,उमा खापरे हे पहिल्याच फेरीत विजयी झाले.काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे,भाई जगताप आणि भाजपाच्या प्रसाद लाड यांच्यातील चुरस पुढच्या फेरीपर्यंत रंगली.चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते.पहिल्या फेरीत त्यांनी २२ तर भाई जगताप यांनी १९ मते मिळविली होती.काँग्रेसचा एकही उमेदवार पहिल्या फेरीत यश मिळवू शकला नाही.दुस-या फेरीत भाई जगताप यांना दुस-या पसंतीची धरून २६ मते मिळाली तर प्रसाद लाड यांना २८ मते मिळाली.२२ मते मिळविणा-या चंद्रकांत हंडोरे यांचा मात्र पराभव झाला.

भाजपाला १३३ मते- अतुल भातखळकर

भाजपाला राज्यसभा निवडणुकीत १२३ मते मिळविण्यात यश आले होते.यावेळी मात्र भाजपाने १३३ मते मिळविल्याचा दावा भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.पहिल्या फेरीत भाजपाच्या श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे यांनी प्रत्येकी ३० मते मिळविली.प्रवीण दरेकर यांनी २९,उमा खापरे यांनी २७ तर प्रसाद लाड यांनी १७ पहिल्या पसंतीची मते मिळविल्याचा दावा अतुल भातखळकर यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने मिळविली ५७ मते

भाजपामधील मित्रांची साथ-एकनाथ खडसे

राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतची ५१ मते असतानाही ५७ मते मिळविली आहेत.याचाच अर्थ राष्ट्रवादीला ६ मते अतिरिक्त मिळाली आहेत.भाजपमधील आपल्या मित्रांनी आपल्याला साथ दिल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

शिवसेनेला मिळाली ५२ मते

शिवसेनेच्या सचिन अहिर आणि आमश्या पाडवी यांना प्रत्येकी २६ मते मिळाली आहेत.शिवसेनेकडे एकूण ५५ मते होती.शिवसेनेला त्यातील ५२ मते मिळाली आहेत.मात्र आमची तीन मते फुटलेली नसून आम्ही आघाडीचा धर्म पाळून ती मित्रपक्षाला दिली असल्याची माहिती शिवसेनेचे विजयी उमेदवार सचिन अहिर यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in