
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमध्ये काही दिवसांपूर्वी दूषित पाणी अन् निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली, असा तारांकित उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत उपस्थित केला. वसतिगृहात दूषित पाणी आणि जेवणाच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. गंभीर प्रश्नी तक्रारींची दखल घेत विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी परिषदेतील सदस्य, विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी व विद्यापीठाचे सदस्य यांची समिती स्थापन करत त्या ठिकाणची पाहणी करण्यात येईल. तसेच समितीचा अहवाल तयार करून समस्या सोडवण्यात येतील, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोतनीस यांच्या तारांकित प्रश्नावर उत्तर देत स्पष्ट केले.
मुंबई विद्यापीठाच्या कलीना कॅम्पसमधील वसतिगृहात राहणाऱ्या ४० हून अधिक विद्यार्थ्यांना एप्रिल महिन्यात दूषित पाणी आणि निकृष्ट अन्नामुळे विषबाधा झाल्याचे समोर आले होते. विद्यापीठातील सर्व मूलभूत सेवांचा दर्जा खालावल्यामुळे मुलींसाठी असलेल्या चार वसतिगृहांपैकी एकाही वसतिगृहात खाणावळीची सोय नाही. विद्यापीठातील उपहारगृह अनेक वर्षांपासून एकाच कंत्राटदाराकडे असल्याने खानपानाचा दर्जा प्रचंड खालावलेला आहे. शिवाय पालिकेकडून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे, कुलरच्या अस्वच्छतेमुळे विद्यार्थिनींच्या प्रकृतीला धोका निर्माण झाल्याचे आमदार विलास पोतनीस यांनी निदर्शनास आणून दिले होते.
समितीचे ‘असे’ होणार काम
विद्यापीठातील वसतिगृहासह इतर सर्व प्रकारच्या सेवा-सुविधा उत्तम दर्जाच्या देण्यासाठी पाच सदस्यीय समिती अभ्यास करेल. या समितीत सरकारच्या प्रतिनिधीसह विद्यार्थी प्रतिनिधीही असेल. या अहवालानंतर आवश्यक सुविधा देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातील, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे वसतिगृह सुरू करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर कार्यवाही सुरू असून शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे यावेळी पाटील म्हणाले.