स्वच्छ मुंबईसाठी जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी पालिकेतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत असून आता आयुर्मान संपुष्टात आलेल्या जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार आहेत. जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये काढण्यासाठी स्वतंत्र स्क्रॅप यार्ड उभारण्यात येणार आहे.
स्वच्छ मुंबईसाठी जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये
Published on

मुंबई : स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी पालिकेतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत असून आता आयुर्मान संपुष्टात आलेल्या जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार आहेत. जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये काढण्यासाठी स्वतंत्र स्क्रॅप यार्ड उभारण्यात येणार आहे. यामुळे परिसर स्वच्छ राहिल आणि मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला. यासाठी लवकरच ग्लोबल टेंडर प्रक्रिया राबवण्यात येईल, असेही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ३ डिसेंबरपासून डीप क्लिनिंग मोहिमेचा शुभारंभ झाला. डीप क्लिनिंग मोहिमेंतर्गत बेवारस वाहने हटविणे, सार्वजनिक ठिकाणे, अनधिकृत बांधकामे, धोकादायक झाडे, बॅनर व फलक हटविण्याच्या नोटीस बजावणे असा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यात आता मुंबईतील वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये काढण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्क्रॅपेज धोरण २०२३ च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जुन्या गाड्यांची विल्हेवाट करणे तसेच नवीन स्क्रॅप यार्ड उभारण्यात येणार आहे. यामुळे जुन्या गाड्या स्क्रॅपमध्ये काढण्यात येतील आणि पालिकेला उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वाहतूक फलकासाठी १८० कोटी

दुचाकी, चारचाकी, बसेस अशी सुमारे ४५ लाख वाहने मुंबईच्या रस्त्यांवर धावतात. वाहनचालकांना इच्छित स्थळी जाण्यात कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी मुंबईचे रस्ते, जंक्शनवर दिशादर्शक फलक लावण्यात येतात. आता आधुनिक चिन्हांसह दर्जेदार वाहतूक फलक लावण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी मुंबई शहर ६० कोटी, पूर्व उपनगर ६० कोटी व पश्चिम उपनगर ६० कोटी असे एकूण १८० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in