गणेशोत्सवासाठी पालिका अॅक्शन मोडवर प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई तीव्र होणार

गणेशोत्सवासाठी पालिका अॅक्शन मोडवर प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई तीव्र होणार

लवकरच सुरू होणाऱ्या कारवाईत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांचे भरारी पथक असणार आहे

मुंबई गणेशोत्सवात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्यांवर तीव्र कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे भरारी पथक असणार आहे. पालिकेच्या २४ वॉर्डात २४ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पालिकेचे तीन व पोलीस दलातील एक अशा पाच जणांच्या टीमकडून प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.

१९ सप्टेंबरला लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज झाली असून गणरायाच्या आगमनानंतर नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी, ख्रिसमस असे सण साजरे करण्यात येतात. सणासुदीच्या काळात प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांची विक्री सर्रास होते. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी मुंबई महापालिकेचे अधिकारी छापा टाकतात. परंतु फेरीवाल्यांना छापा पडणार असल्याचा सुगावा आधीच लागत असल्याने ते जागेवरून काही काळ गायब होतात. त्यामुळे कारवाई अधिक तीव्र करण्यासाठी एका वॉर्डातील अधिकारी दुसऱ्या वॉर्डात छापा टाकणार, जेणेकरून फेरीवाल्यांना अधिकाऱ्यांची ओळख पटणार नाही, असा प्रयोग केला. परंतु हा प्रयोगही फारसा यशस्वी झाला नाही. त्यामुळे आता प्लास्टिक पिशव्या विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी पालिकेच्या दिमतीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे २४ अधिकारी असतील, असे पत्र दिले आहे. त्यामुळे लवकरच सुरू होणाऱ्या कारवाईत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांचे भरारी पथक असणार आहे.

कारवाईसाठी असे असणार पथक

एमपीसीबीचे २४ अधिकारी

पालिकेचे ३ अधिकारी

प्रत्येक वॉर्डासाठी एक असे २४ पोलीस अधिकारी

आतापर्यंत केलेली कारवाई

४,९०५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

दंड वसूल - ७६ लाख ४०

न्यायालयात खेचले - ३७ प्रकरण

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in