धारावीच्या इतिहासात प्रथमच पुनर्विकास प्रत्यक्षात पुढे सरकला; भूमिपूजन सोहळा पडला पार

धारावीच्या इतिहासात प्रथमच पुनर्विकास प्रत्यक्षात पुढे सरकला; भूमिपूजन सोहळा पडला पार

गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणाचा मुहूर्त साधून धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा. लि. (डीआरपीपीएल) ने गुरुवारी सकाळी माटुंगा येथील आरपीएफ मैदानावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पाडला.
Published on

मुंबई : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणाचा मुहूर्त साधून धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा. लि. (डीआरपीपीएल) ने गुरुवारी सकाळी माटुंगा येथील आरपीएफ मैदानावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पाडला.

सेक्टर ६ भागात झालेल्या या भूमिपूजनाने रेल्वे कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आणि कार्यालये उभारण्याच्या कामाचाही शुभारंभ झाला. धारावी पुनर्विकासाच्या निविदेनुसार, ही रेल्वे कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आणि कार्यालये सरकारकडे हस्तांतरित केली जाणार आहेत. पुनर्विकासाची गती वाढवण्यासाठी आणि सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करण्यासाठी सध्या राज्य सरकार धारावीत घरोघरी जाऊन पात्र आणि अपात्र रहिवाशांचे सर्वेक्षण करत आहे.

राज्य सरकार आणि अदानी समूह यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या डीआरपीपीएलने सध्या एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. २०३० पर्यंत मुंबईला झोपडपट्टीमुक्त शहर बनविण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

गुरुवारी, झालेल्या या भूमिपूजन सोहळ्याचे महत्त्व हे केवळ धारावीच्या रहिवाशांसाठी आणि व्यावसायिकांपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मुंबईसाठी महत्त्वाचे आहे. किमान १० लाख लोकांना मोठ्या, आधुनिक घरांसह उच्च दर्जाच्या सुविधा या पुनर्विकास प्रकल्पामुळे मिळणार आहेत. या पुनर्विकासामुळे धारावीतील अनेक लघू उद्योगांना लाभ होईल. या लघु उद्योगांनी आपली स्वतःची अशी छोटेखानी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. परंतु, अपुऱ्या जागेअभावी त्यांना अत्यंत खराब स्थितीत राहून काम करावे लागतेय.

धारावी पुनर्विकास प्रकल्प भारताला जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पुनर्वसनाच्या संदर्भात प्रमुख स्थान देईल. इथल्या रहिवाशांना ३५० चौ. फूट आधुनिक घरे दिली जातील. ज्यात स्वयंपाकघर आणि शौचालय असेल आणि उच्च दर्जाचे रस्ते, रुग्णालये, शाळा, उघड्या जागा इत्यादी सुविधा उपलब्ध असतील. या घरांचा आकार मुंबईतल्या अन्य कोणत्याही झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांपेक्षा १७ टक्के अधिक आहे, असे सांगण्यात आले.

धारावी पुनर्विकास प्रकल्प देशातील महत्त्वाचा पुनर्विकास प्रकल्प आहे. ज्यात अपात्र मानल्या गेलेल्या व्यक्तीला देखील घर मिळेल. या अपात्र रहिवाशांना दोन उपवर्गात विभागले गेले आहे. १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ दरम्यानच्या कालावधीतील रहिवाशांना मात्र परवडणाऱ्या किमतीत मालकीची घरे दिली जातील, असे सांगण्यात आले.

‘धारावीकरांना थेट घराची चावी देणार’

डीआरपीपीएलच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, हा भूमिपूजन सोहळा आधुनिक धारावी निर्माण करण्यासाठीच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल होते. ते पुढे म्हणाले की, “आम्ही जगातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या विभागाचा पुनर्विकास करतो आहोत. आम्ही धारावीकरांना ‘की टू की’ म्हणजे थेट घराची चावी देण्याबद्दलच आश्वासित केले आहे. ज्यात विद्यमान रहिवाशांना तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतरीत न करता निश्चित कालावधीत घरे देण्याची ग्वाही दिली आहे.”

logo
marathi.freepressjournal.in