मुंबईच्या इतिहासात ५० वर्षांत प्रथमच गेल्या वर्षी मुंबई थांबली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे मुंबई महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजना. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत ३०० मिमी पाऊस पडला तरी मुंबई थांबणार नाही, असा विश्वास पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांनी व्यक्त केला.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील सखल भागात पाणी साचते आणि मुंबई ठप्प होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मुंबई महापालिकेने हिंदमाता, किंग सर्कल, अंधेरी सब-वे या ठिकाणी भूमिगत पाणी साठवण टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे फ्लडिंग पॉइंट्सची संख्या कमी झाली आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी यंदा ४८० पंप बसवण्यात येणार असून काही ठिकाणी ३ हजार क्षमतेचे चार पंप बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदा दिवसभरात ३०० मिमी पाऊस पडला तरी मुंबई ठप्प होणार नाही, असा विश्वास चहल यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी मुंबईत २८२ मिमी पाऊस २४ तासांत पडला होता. पण मुंबई थांबली नाही, असेही चहल यांनी सांगितले.
पावसाची रिअल टाइम नोंद
हिंदमाता, मिलन सब वे, किग्ज सर्कल, रेल्वे स्थानक आदी फ्लडिंग पॉइंट्सवर पडणाऱ्या पावसाची नोंद ठेवली जाणार आहे. फ्लडिंग पॉइंट्सच्या ठिकाणी किती पाऊस पडला, पाऊस थांबल्यानंतर त्या ठिकाणचे पाणी किती वाजता ओसरले यांची रिअल टाईम नोंद होणार आहे. फ्लडिंग पॉइंट्सवर एक खांब उभारण्यात येणार असून त्यावर खोलगट वाटी ठेवण्यात येणार असून वाटीत जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्यावरुन किती पाऊस पडला, किती वाजता पाणी ओसरले याची प्रत्येक अपडेट मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे फ्लडिंग पॉइंट्स परिसरातील परिस्थीतीचे अपडेट मुंबईकरांना मिळणार, अशी माहिती पर्जन्य वाहिनी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
या भागात फ्लडिंग पॉइंट्स
वांद्रे पश्चिम, ई विभाग, माटुंगा, वडाळा, अंधेरी पूर्व, डी विभाग, मालाड, भांडुप, अंधेरी पश्चिम, वरळी, प्रभादेवी, घाटकोपर, आर दक्षिण, आर सेंट्रल, एफ साऊथ, पी - दक्षिण, एम पश्चिम, एम पूर्व, दादर, माहिम, धारावी, एच पूर्व, आर उत्तर, कुर्ला, मुलुंड, कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट, भायखळा, सेंडहास्टॅ रोड - ४