मुंबईतील कलिना कॅम्पसमध्ये राहणारे सर्पमित्र अमान खान (२०) यांच्या घरात एक ते दीड फुटांच्या १६ नवीन जीवांनी जन्म घेण्यास सुरुवात केली आहे. हे १६ जीव अजगराची (मादी) पिल्ले आहेत. अमान खान यांच्या घरात एका थर्माकोलच्या बॉक्समध्ये १० मे पासून कृत्रिम व पोषक असे वातावरण निर्माण केल्यानंतर या शुक्रवारपासून अजगराच्या अंड्यांमधून एकेक करून अजगराची एक ते दीड फुटांची पिल्ले बाहेर पडू लागली आहेत.
त्यांना बघायला अमानच्या घरात बघ्यांची गर्दी होत आहे. मात्र सर्प व प्राणी प्रेमी अमान त्या अंड्यांची व अजगराच्या पिल्लांची जीवापाड काळजी घेत आहे. देशात यापूर्वी उडीसा व मद्रास या दोन ठिकाणी अजगर, सापांच्या अंड्यांना कृत्रिम पद्धतीने पोषक वातावरण निर्माण करून अंडे उबवून त्यातून सापांच्या पिल्लांनी जन्म घेण्याची ही महाराष्ट्रात व मुंबईत पहिली तर देशातील तिसरी घटना आहे.
मुंबई महापालिकेच्या भांडुप संकुल येथील जंगलात बिबट्या, वाघ, साप, अजगर, काळवीट, सशे असे अनेक प्राणी राजरोसपणे वावरत असतात. मात्र एका अजगराने (मादी) काही अंडी भांडुप संकुलातील नाल्याच्या ठिकाणी उघड्यावर घातल्याचे १० मे रोजी सर्पमित्र हसमुख वळंजू (२९) यांना आढळून आले. त्यांनी त्यांचा सांताक्रूझ, कलिना कॅम्पस येथे राहणारा सर्प मित्र अमान खान (२१) यांना कळवले.
मात्र अमनने त्या अंड्यांना कोणी नुकसान पोहोचविण्यापूर्वीच वन खात्याच्या परवानगीने त्यांना तेथून हलवले.